नंदकुमार ढेरे - चंदगड -गेली चार वर्षे बंद असलेल्या दौलत कारखान्यातील कामगारांना ५० महिने झाले पगार नाही. पण, आज-उद्या पुन्हा दौलत सुरू होईल या आशेवर कर्जबाजारी होऊनसुद्धा बंद कारखान्यात नित्य नियमाने येणाऱ्या कामगारांनी गेल्या चार दिवसांपासून कारखान्याकडे पाठ फिरविल्याने ‘दौलत’ची राखण करण्याची वेळ आता संचालक मंडळावर आली आहे. दिवसा यशवंतराव चव्हाण कॉलेजचे दोन शिपाई व रात्री एक संचालक व त्यांचे कार्यकर्ते दौलतची राखण करत आहेत.गेली चार वर्षे दौलत साखर कारखाना बंद अवस्थेत आहे. दौलत सुरू करण्यासाठी दौलतचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील व संचालक मंडळ यांचे प्रयत्न अपुरे पडल्याचे दिसत आहे. दौलतवर ३०० कोटींपेक्षाही जास्त कर्जाचा डोंगर झाल्याने कोणतीही कंपनी दौलत चालविण्यास धजत नाही. दौलत घेण्यासाठी अनेक कंपन्या दौलत कार्यस्थळला भेट देत आहेत. नेमकी अडचण कुठे निर्माण होत आहे, हे अद्याप कुणालाही समजलेले नाही. याबाबत गोपाळराव पाटील यांना कुणीही विचारले की, अमूक तारखेला पार्टी येणार, दौलत सुरू करण्याच्या वाटाघाटी होणार, असे सांगून तब्बल चार वर्षे वेळ मारून नेली. तारखांवर तारखा दिल्याने कामगारांसह शेतकरी वर्ग कार्यकर्त्यांचाही गोपाळरावांवरचा दौलतबाबतचा विश्वास उडाला. गोपाळरावांना दौलत सुरू करायचा आहे की नाही किंवा यापेक्षा त्यांच्या मनात आणखी काही वेगळे आहे. याबाबत त्यांनीही आजपर्यंत एखादी बैठक घेऊन शेतकरी, कामगार, कार्यकर्ते यांच्यासमोर किंवा प्रसार माध्यमासमोर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे गोपाळराव पाटील यांच्या दौलतबाबतच्या भूमिकेबाबत लोकांत साशंकता निर्माण झाली आहे. गेली चार वर्षे दौलत बंद असल्यामुळे जवळपास ५० महिने कामगार पगाराविना काम करीत आहेत. काही कामगार कार्यस्थळावरील खोल्या सोडून गावी गेले. काही कामगारांच्या बायका मोलमजुरी करण्यासाठी जवळच्या शेतात जात आहेत. भविष्याची चिंता लागलेले कामगार कर्जाच्या ओझ्याखाली दबत आहेत. एकवेळ कर्ता पुरूष म्हणून कुटुंब चालविलेल्या दौलतच्या कामगारांना कारखान्याकडे कामावर येण्यासाठी बहीण, भाऊ, शेजारी मित्रमंडळीकडे हात पसरावे लागत आहे. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या कामगारांनी चारदिवसांपूर्वी संचालक मंडळाला दौलतबाबत निर्वाणीचे विचारले; परंतु त्यांच्याकडून अमूक तारखेला होणार हे जुनेच उत्तर मिळाल्याने सर्व कामगारांनी कामावर येण्याचेच बंद केले. त्यामुळे दौलतची राखण करण्याची वेळ संचालकांवर आली आहे.दौलतची राखण करण्यासाठी दिवसा दौलतशी संबंधित असलेल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे दोन शिपाई दिवसभर पहारा देत आहेत. तर रोज रात्री आळी-पाळीने एक संचालक आपले दोन-चार कार्यकर्ते घऊन रात्रभर पहारा देत आहेत. दौलतचा संचालक म्हणजे ‘गोकुळ’चा संचालक अशी तुलना केली जायची. पण, आज दौलतच्या संचालकांवर दौलतचीच राखण करण्याची नामुष्की आली आहे.७ जानेवारी रोजी कारखाना कार्यस्थळावर कामगारांनी बैठक बोलावली होती. सर्व कामगारांनी यावेळी गोपाळराव पाटील व इतर संचालकांना बैठकीला येण्याचे आमंत्रण दिले होते. पण, त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली. त्यामुळे कामगारांच्या भावना तीव्र झाल्या. गोपाळरावांसह संचालकांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याची चर्चा कामगारांनी केली. जो उद्रेक प्रथम शेतकरी वर्गातून होणे आवश्यक होता तो आता कामगारातून होणार हे आजच्या बैठकीतून दिसून आले. त्यामुळे भविष्यात संचालक विरूद्ध कामगार, शेतकरी असे चित्र दिसणार आहे.
कामगारांची ‘दौलत’कडे पाठ !
By admin | Published: January 08, 2015 10:55 PM