समीर देशपांडेकोल्हापूर : शिवसेनेतील ठाकरे गट अस्वस्थ आणि भाजप झालाय बेशिस्त असे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. दोन्ही पक्षांतील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी याला कारण ठरल्या आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचेच यानिमित्ताने दिसून आले आहे.विजय देवणे यांची जिल्हाप्रमुख पदावरून करण्यात आलेली उचलबांगडी त्यांना झोंबली . पण ते संघटना सोडून जातील असे वाटत नाही. सुनील शिंत्रे यांच्या निवडीने ते अस्वस्थ झाले हे निश्चित. शिंत्रे हे गेली अनेक वर्षे शिवसेनेत असले तरी त्यांच्या मामी अंजना रेडेकर या काँग्रेसमधील सक्रिय नेत्या आहेत. शिंत्रे यांनी गडहिंग्लज बाजार समितीमध्ये शिवसेनेतून तिकीट न मिळाल्याने काँग्रेसमधून पत्नीसाठी संचालकपद मिळवल्याने देवणे यांनी याबाबत तक्रार केली होती. याचदऱम्यान देवणे यांच्याही कार्यपध्दतीबाबत तक्रारी झाल्या आणि शिंत्रे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. म्हणजेच वरिष्ठांनी शिंत्रेंनाच पाठबळ दिले.दुसरीकडे हातकणंगले सहसंपर्कप्रमुखपद वंचितमधून शिवसेनेते आलेले हाजी अस्लम सय्यद यांना दिल्याने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव संतप्त झाले आहेत. त्यांनी त्याच दिवशी तीन नेत्यांना नाराजी कळवली. परंतु जाधव यांना ‘गाेकुळ’सारखे सहजासहजी न मिळणारे पद दिल्यानंतर आता त्यांचे फार काही ऐकून घेतले जाईल असे वाटत नाही.चार दिवसांपूर्वी भाजप महानगरची एक आणि ग्रामीणच्या दोन कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर पहिला नाराजीचा बॉम्ब आजऱ्यात फुटला. सात वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या अशोक चराटी गटाचे अनिरुद्ध केसरकर यांना तालुकाध्यक्षपद दिल्याने भाजपचे जुने कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी हा संताप थेट कार्यालय बंद करून, फलक काढून, कमळ चिन्हावर पांढरा रंग लावून व्यक्त केला. यातील सुधीर मुंज आणि मलिक बुरुड हे गेली चाळीस वर्षे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत आहेत. परंतु पाटील यांच्याकडून कामे होत नाहीत असा आरोप करत, शिवाजी पाटील यांना चंदगडमधून पाडायलाही ते कारणीभूत आहेत, असा आरोप करत अरुण देसाई यांनी खळबळ उडवून दिली.गेल्या काही वर्षांमध्ये ज्येष्ठ नेते बाबा देसाई भाजपमध्ये सक्रिय नाहीत. माजी आमदार सुरेश हाळवणकर हेही नाराज असल्याचे सांगण्यात आले. मंत्री पाटील यांनी महानगरची नावे आपण निश्चित केली परंतु ग्रामीण नावे निश्चित करताना खासदार धनंजय महाडिक आणि समरजित घाटगे यांना झुकते माप दिले आहे हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत आजऱ्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी लावलेली वात आणखी काही तालुक्यात पेटणार की विझणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
कुंभार यांच्याऐवजी चराटी उपाध्यक्षआजऱ्यातील प्रकार समजल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी तातडीने बदल करत सुधीर कुंभार यांची उपाध्यक्षपदी झालेली निवड रद्द करून त्याजागी अशोक चराटी यांची नियुक्ती केली आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा न करता थेट पक्षाचेच काम थांबवण्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने आता त्यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले.