कोल्हापूर : तांत्रिक बाबींची पूर्तता करून लवकरच कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) थॅलेसेमिया उपचार केंद्र सुरू करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुंबईतील बैठकीत दिले. आमदार राजेश क्षीरसागर व वैद्यकीय शिक्षण व संशोधनाचे संचालक डॉ. प्रवीण शिणगारे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. मोहन जाधव, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, ‘सीपीआर’चे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिवाजी साठे यांच्या उपस्थितीत मंत्री सावंत यांच्या दालनात ही बैठक झाली. थॅलेसेमिया या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ‘सीपीआर’मध्ये स्वतंत्र कक्षाची स्थापना १९ एप्रिल २०१६ रोजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाली. या कक्षामध्ये रुग्णांना नियमितपणे रक्त व औषधे दिली जातात. यापूर्वी ही औषधे आणण्यासाठी रुग्णांना सातारा येथे जावे लागत असे. आता रुग्णांना ही औषधे ‘सीपीआर’मध्ये मिळतात. कोल्हापूर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमधून थॅलेसेमिया रुग्ण येथे येऊ लागले आहेत. यामुळे ‘सीपीआर’मधील या रुग्णांकरिता थॅलेसेमिया उपचार केंद्र व औषधांची उपलब्धता याविषयी कायमस्वरूपी तरतूद होण्याची गरज भासू लागली होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार क्षीरसागर यांनी मंत्री सावंत यांच्याबरोबर पावसाळी अधिवेशनात बैठक आयोजित केली. या बैठकीत अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी थॅलेसेमिया कक्षाबाबतची माहिती व अडीअडचणींचे सादरीकरण केले. त्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी सीपीआर येथे थॅलेसेमिया उपचार केंद्रास मान्यता मिळावी व औषधांच्या उपलब्धतेसाठी कायमस्वरूपी तरतूद करावी, अशी आग्रही भूमिका घेतली. यावर मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी, ‘सीपीआर’मध्ये थॅलेसेमिया उपचार केंद्र सुरू करू, असे आश्वासन बैठकीत दिले. या निर्णयामुळे थॅलेसेमिया केंद्र अधिक सक्षमपणे चालविण्याचा मार्ग सुकर झाला. (प्रतिनिधी)
‘सीपीआर’मध्ये थॅलेसेमियावर उपचार
By admin | Published: August 08, 2016 12:39 AM