ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 09 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जुन्या पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेऊन ५० दिवस उलटले तरी अद्यापही बँकांसमोरील रांगा कायम आहेत. नवीन चलन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेस पक्षातर्फे छत्रपती शिवाजी चौकात ‘थाळी नाद’ आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व महिला काँग्रेसच्या निरीक्षक मनिषा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात थाळी-नाद आंदोलन केले. जुन्या नोटा बंदीच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्यांना बसल्याच्या निषेधार्थ मोदी सरकारविरोधी घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होते. त्यामध्ये महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्याच्या दिवसापासून देशात आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. मोदींनी जनतेकडून मागितलेली ५० दिवसांची मुदत संपली आहे. त्यामुळे बँक आणि एटीएम सेंटरमधून पैसे काढण्यावरील निर्बंध हटवावेत, अशी काँग्रेसची मागणी आहे. ज्या कारणांसाठी हा निर्णय घेण्यात आला, त्यामधून काहीच निष्पन्न झाल्याचे दिसत नाही. ५० दिवस संपल्यानंतरही परिस्थिती काही बदललेली नाही. बँकांसमोरील रांगा अजूनही कायम आहेत. हातात रोख चलन नसल्याने सर्व स्तरांतील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मोदींच्या एका चुकीच्या निर्णयामुळे जगभर भारताचे हसू झाले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांचे निच्चांकी स्तरावर अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे मोदींनी आपल्या फसलेल्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारून देशाची माफी मागावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, शहराध्यक्षा संध्या घोटणे, सरलाताई पाटील,चंदा बेलेकर, वैशाली महाडिक, दीपा पाटील, शर्मिला यादव, वर्षा मोरे, यास्मिन शेख, लीला धुमाळ, भारती केकलेकर, बाळाबाई निंबाळकर, मोहिनी घोटणे, आसावरी माने, सविता रायकर, सरिता पाटील, सुशीला रेडेकर, रूक्साना सय्यद, नगरसेविका उमा बनछोडे, नीलोफर आजरेकर, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, अॅड. सुरेश कुराडे, गोकुळ दूध संघाचे संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, किशोर खानविलकर, संपतराव चव्हाण, एस. के. माळी, दयानंद नागटिळे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी-सदस्य सहभागी झाले होते.