कोल्हापूर : शहरातील वीस कोटींचे रस्ते, टोल रद्दचा निर्णय यावरून बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत श्रेयवाद उसळला. पक्ष, नेते यांच्याबाबत आपली निष्ठा कशी व किती जास्त आहे, हे प्रत्येकाने दाखविण्याचा प्रयत्न केल्याने सभागृहात सदस्यांमध्ये वादाला तोंड फुटले. दोन्ही आघाड्यांतील महिला सदस्यांनी उभे राहून एकमेकांना सभागृहाची शिस्त शिकविण्याचा प्रयत्न केल्याने सुमारे पाऊण तास गोंधळ निर्माण झाला. पावसामुळे शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत विषयाला प्रारंभ झाला. ज्यांनी वीस कोटींचे रस्ते मंजूर करून आणले वश्रेयवादासाठी कोपऱ्या-कोपऱ्यांवर फलक उभारले, त्यांनीच खराब रस्त्यांसाठीही जबाबदारी घ्यावी, असा टोला अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. यावर किरण नकाते यांनीही ध्वनिक्षेपकाचा ताबा घेत टोलेबाजी सुरू केली. ते म्हणाले, शहरातील रस्ते चकाचक होण्यासाठी टोल आणला म्हणून मोठमोठे होर्डिंग उभा करणाऱ्या दोन मंत्र्यांनी टोल नागरिकांना डोईजड झाल्याने तो पुन्हा पंचगंगेत बुडविण्याचे आश्वासन देऊन नागरिकांची फसगत केली; पण भाजप सरकार आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे टोल रद्द केला, या नकाते यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी आक्षेप घेतला.सर्वपक्षीयांनी केलेल्या आंदोलनाच्या रेट्यामुळे चंद्रकांतदादांवर टोल रद्द करण्याची पाळी आली, असे ते म्हणाले. यामुळे भाजप व ताराराणी आघाडीचे सर्व सदस्य उठून उभे राहिले. (पान ३ वर)
रस्ते, टोल रद्दवरून श्रेयवाद उफाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2016 12:32 AM