कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आमदार मुश्रीफ यांच्या कट्टर समर्थक चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी मतदारसंघातील विविध कामांना विकासनिधी दिल्याबद्दल बुधवारी वृत्तपत्रांत जाहिरात देऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राजकीय वर्तुळातही याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांमध्ये राजकीय हाडवैर सुरू असताना वहिनींनी मानलेले आभार चर्चेचा विषय ठरला. जिल्हा सहकारी बँकेवरील कारवाई, महापालिका निवडणुकीच्या घडामोडी, आदी विविध कारणांमुळे मुश्रीफ आणि पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. दोघेही संधी मिळेल त्यावेळी टोकाचे आरोप करतात. या दोघांतील राजकीय सख्य जाहीर आहे. गडहिंग्लज कारखान्यात मुश्रीफ यांना रोखण्यासाठी पाटील यांनी मोर्चेबांधणी केली; परंतु मुश्रीफ-कुपेकर, अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या पॅनेलने बहुमत मिळविले. त्यानंतर पाटील विरुद्ध मुश्रीफ असा आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा चांगलाच गाजला. या निवडणुकीत विजयाचा गुलाल पुसण्याआधीच गडहिंग्लज नगरपालिकेला दिलेला निधी काढून घेतल्याचा मुद्दा ऐरणीवर आला. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असे राजकीय वातावरण गरम झाले आहे. दरम्यान, चंदगड विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या कामांना २२ कोटी ६३ लाखांची अर्थसंकल्पात विशेष तरतूद केल्याबद्दल आमदार कुपेकर यांनी पालकमंत्री पाटील यांचे जाहिरात देऊन आभार मानले. परिणामी मुश्रीफ, कुपेकर व पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षपात नसल्याचा संदेश गडहिंग्लज कारखान्यात बहुमत न मिळाल्याच्या रागातून नगरपालिकेला दिलेला निधी काढून घेतल्याचे आरोप पालकमंत्री पाटील यांच्यावर राष्ट्रवादी व जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी केले आहेत; पण राष्ट्रवादीच्या आमदारांनी निधी दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानल्यामुळे दादांकडून पक्षपातीपणा करीत नसल्याचा संदेश भाजपच्या पथ्यावर पडला आहे.
कुपेकरांकडूून दादांचे ‘आभार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2016 12:30 AM