कोल्हापूर : राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील सहायक प्राध्यापकांच्या भरतीला कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी स्थगिती दिली असली तरी ही सहायक प्राध्यापकांची पदे स्वतंत्र आयोगामार्फत भरण्यासंदर्भात प्रशासन विचाराधीन आहे. तशा वेगवान हालचालीही सुरू झाल्या असल्याचे कळते.प्राध्यापक भरतीबाबत वारंवार कुलपतींकडे तक्रारी येत असल्याने त्यांनी विद्यमान दोन कुलगुरुंची समिती स्थापन करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना आचारसंहितेपूर्वी दिल्या होत्या. शिवाय त्यांनी सर्व विद्यापीठांमधील कुलगुरुंचे अभिप्रायही मागवले होते. ही पदे स्वतंत्र आयोगामार्फत भरण्यासाठी अनेक कुलगुरुंनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसंदर्भातील तक्रारी, सावळागोंधळ टाळण्यासाठी ही भरतीप्रक्रिया स्वतंत्र आयाेगाकडून राबविली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीच कुलपतींनी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सर्व विद्यापीठात सुरू असलेल्या भरतीप्रक्रियेला स्थगिती दिली असल्याचे मानले जाते.मध्यंतरी २०८८ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असताना कित्येक महाविद्यालयांत निवड प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी वारंवार राज्यपाल दरबारी झाल्या. या तक्रारी आधारे राज्यपालांनी संबंधित विद्यापीठे आणि संचालक यांना चौकशी समित्या नेमून अहवाल सादर करण्याचे आदेशित केले होते. या भरतीप्रक्रियेबाबत वारंवार तक्रारींचा पाऊस पडत असल्याने ही प्रक्रिया स्वतंत्र आयोगामार्फत करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांनी आवाज उठवला होता. याबाबत हालचाली सुरू झाल्याने प्राध्यापक भरतीतील गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराला कायमचा आळा बसूून गुणवत्ताधारक नेट, सेट, पीएच.डी पात्रताधारकांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
प्रक्रिया लवकर पार पाडण्याची मागणीराज्यातील अकृषी विद्यापीठात ११६६ पदे आणि महाविद्यालयांत हजारो पदे रिक्त आहेत. त्याचा प्रत्यक्ष परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधनावर होत आहे. पूर्णवेळ प्राध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल उच्चशिक्षणाकडून बदलल्याचे चित्र आहे; परिणामी अनुदानित अभ्यासक्रमांची विद्यार्थिसंख्या घटत असल्यामुळे शिक्षकांची कित्येक पदे संपुष्टात आली आहेत. काही ठिकाणी ही पदे अतिरिक्त ठरली आहेत. त्यामुळे ही भरतीप्रक्रिया लवकरात लवकर करा, अशी मागणी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून होत आहे.
स्वतंत्र आयोगामार्फत प्राध्यापक भरतीप्रक्रिया सुरू झाल्यास आनंद आहे. मात्र, यात त्यांनी वयोमर्यादेची अट लावू नये. पात्रतेसाठी वयोमर्यादेची अट लागू केल्यास दशक दोन दशकांपासून तासिका किंवा कंत्राटी प्राध्यापक म्हणून काम करत असणाऱ्यांना चाळिशी - पंचेचाळिशी पार केलेल्यांना सहायक प्राध्यापक होता येणार नाही. - नितीन घोपे, सचिव, सीएचबी प्राध्यापक संघटना