समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, यावेळी शैक्षणिक पात्रता आणि उमेदवारांच्या वयोमर्यादेतही वाढ करण्यात आली आहे.याआधी अंगणवाडी सेविकेसाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता होती. ती आता १२ वी उत्तीर्ण करण्यात आली आहे. तर मदतनीससाठी सातवी उत्तीर्णची आधीची पात्रता रद्द करून ती देखील १२ वी उत्तीर्ण करण्यात आली आहे.तसेच याआधी उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ३० अशी होती. यामध्येही बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना आता यासाठी अर्ज करता येणार आहे. विधवा महिलांना वयाच्या चाळीशीपर्यंत अर्ज करता येईल. सध्या सर्व जिल्हा परिषदांकडून मदतनीसांमधून सेविकांची पदोन्नतीने भरती करण्याची प्रक्रिया सुरू असून यानंतर मदतनीसांच्या रिक्त पदांचा आकडा निश्चित झाल्यानंतर ती भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
बारावीच्या गुणांना मोठे महत्त्वया निवड प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांना १२ वीला ८० टक्केहून अधिक गुण आहेत त्यांना १०० पैकी ६० गुण देण्यात येणार आहेत. ७०.०१ ते ८० टक्क्यांपर्यंतच्या उमेदवारांना ५५ तर ६०.०१ ते ७० टक्क्यांपर्यंतच्या उमेदवारांना ५० गुण देण्यात येतील. त्याखाली गुण असणाऱ्यांना ४५, ४० आणि ४० टक्केहून कमी गुण असणाऱ्या सरासरी ३५ गुण देण्यात येणार आहेत. पदवीधर आणि त्यातूनही अधिक शिक्षण घेतले असल्यास त्यांना वाढीव गुण देण्यात येणार आहेत.
यांनाही अधिक गुणविधवा आणि अनाथ, अनुसूचित जाती जमाती यांना १० गुण, इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग आणि सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्यास प्रत्येकी ५ गुण जादा देण्यात येणार आहेत.मोबाइल नीट वापरता यावाआता अंगणवाड्यांसंबंधित सर्व अहवाल, शालेय पोषण आहार वाटप, मुलामुलींच्या वजनांची नोंद ही सर्व कामे मोबाइलवरच करावी लागतात. त्यामुळे ॲन्ड्रॉईड मोबाइल सुलभपणे वापरता येणाऱ्या उमेदवारांची आवश्यकता असल्याने शैक्षणिक पात्रता १० वी व सातवीवरून १२वी करण्यात आली आहे.