कोल्हापूर : महिला कुस्तीपट्टूंवर लैगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांस जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार कोल्हापुरातील महिला तसेच आजी माजी खेळाडूंनी सोमवारी केला. ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या मागणीसाठी पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महिला, खेळाडू तसेच विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही तासांसाठी लाक्षणिक उपोषण केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव कमावलेल्या महिला कुस्तीपट्टूंवर कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करुन महिला खेळाडूंनी दिल्लीतील जंतरमंतर येथे धरणे आंदोलन सुरु केले आहे. परंतू केंद्र सरकारने आंदोलनाची दखल घेतलेली नाही, उलट आंदोलन चिरड्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचा निषेध तसेच ब्रिजभूषण यांस अटक करावी, त्यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करावी, या मागणीसाठी कोल्हापुरातील सर्व पक्षीय महिला संघर्ष समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण आयोजित केले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने काही तासच उपोषण करण्यात आले.
आंदोलनात हिंदकेसरी दिनानाथसिंह, हिंदकेसरी विनोद चौगुले, उपमहाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, अर्जूनवीर पुुरस्कार विजेत्या टेनिसपट्टू शैलजा साळोखे, माजी महापौर आर. के. पोवार, महादेवराव आडगुळे, तालीम संघाचे पदाधिकारी व्ही. बी. पाटील, दिलीप पवार, भारती पोवार, सरलाताई पाटील, पद्मजा तिवले, सीमा पाटील, गीता हसूरकर, रुपा शहा, बाबा महाडिक, संदीप देसाई यांच्यासह सुमारे दीडशे कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.