कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामांसाठी गेल्या ११ महिन्यांत आमच्या सरकारने ७६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. येथून पुढच्या काळातसुद्धा अंबाबाई मंदिर परिसर विकास, जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकास, पर्यटनस्थळ विकास, चंदगडचा काजू प्रकल्प, पंचगंगा प्रदूषण रोखणे आदी विकासकामांसाठी जेवढा निधी लागेल तेवढा देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तपोवन मैदानावरील सभेत बोलताना दिले.कोल्हापूरकरांच्या खंडपीठाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना भेटून निर्णय घेण्याची विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबविल्याशिवाय राज्य सरकार स्वस्त बसणार नाही, असेही आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.राज्य सरकारचे निर्णय वेगवान होत आहेत. सर्वसामान्यांच्या हिताचे हे सरकार आहे. त्यांना डोळ्यांसमोर ठेवूनच सरकार योजना आखत असून, त्याची अंमलबजावणीदेखील करीत आहे. आता आमच्या सरकारने गावांचा संपूर्ण विकास करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्यामध्ये रस्ते आहेत. पाणी योजना आहेत. त्याबाबतचे धोरण ठरवून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. हजारो बेरोजगारांना नोकरी, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचेही सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या मातीत धाडसी बाणाकोल्हापूरची माती ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावण झालेली आहे. या मातीने पराक्रम शिकविला. धाडशी बाणा शिकविला. म्हणूनच अनेक संकटे आल्यानंतरही ती कोल्हापूरकरांनी निधड्या छातीवर झेलली. महापूर, कोरोना यासारख्या प्रत्येक संकटावर मात करण्यातही कोल्हापूर यशस्वी झाले. सतत काही तरी नवीन करून दाखविण्याची कोल्हापूरकरांची तयारी असते, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूरचा गौरव केला.
कोल्हापूरकर सतत आग्रहीकोल्हापूरची जनता सतत आग्रही असते. टोल रद्द केल्याशिवाय टोलचे आंदोलन हटले नाही. त्यामुळे ४७३ कोटींचा निधी देऊन टोल रद्द करावा लागला. इतक्या मोठ्या रकमेचा टोल माफ करायला धाडसही लागते. कोल्हापूरकरांच्या या आग्रही भूमिकेमुळे एकाच बैठकीत तो रद्द करावा लागला, असे शिंदे यांनी सांगितले.
५० हजारांचा इन्सेंटिव्ह दिलामविआ सरकारच्या काळात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचा इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, तो शेतकऱ्यांना दिलाच नाही. मात्र, आम्ही सत्तेवर आल्यावर लगेचच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला, असे शिंदे यांनी सांगितले.
पाहुण्यांना कोल्हापूरची शिदोरीपुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याच्या परंपरेला फाटा देत सर्वच प्रमुख पाहुण्यांना दुरडीत भरून कोल्हापूरची शिदोरी देण्यात आली. या दुरडीतून कोल्हापुरी गूळ, चटणी, भडंग, ठेचा देण्यात आला. आकर्षक वेस्टनातील ही शिदोरी उठून दिसली. पाहुण्यांनीही त्याचा कुतूहलाने स्वीकार केला.
मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा चिमटा‘शासन आपल्या दारी’ला काटा किर्र गर्दी झाली आहे. हे पाहून विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार अशी अवस्था झाली असेल, असा चिमटा मुख्यमंत्री शिंदे यांनी घेताच एकच हशा पिकला. लयभारी कोल्हापुरी, कोल्हापूरकरांचा विषय हार्डच असतो, असेही त्यांनी कौतुक केले
सहा महिने थांबची कबुलीशासनाचे काम आणि सहा महिने थांब अशी व्यवस्था यापूर्वी होती, अशी अप्रत्यक्षपणे कबुली मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनीही दिली. ‘शासन आपल्या दारी’त ही कबुली देणारे यापूर्वीच्या सरकारमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून विविध पदांवर होते. अधिकारी, कर्मचारीही हेच होते. यामुळे यांनीच सहा महिने हेलपाटे आणि जोडे फाटेपर्यंत हेलपाटे का मारायला लावत होते, असाही प्रश्न उपस्थित होत होता.
टॉर्च लावून मानवंदनाप्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या लाभार्थी आणि जनसमुदायाने मोबाइलचा टॉच लावून मुख्यमंत्री शिंदे यांना मानवंदना दिली. त्यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी टॉर्चच्या प्रकाशाने लक्ष वेधून घेतले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महेश जाधव, वीरेंद्र मंडलिक, सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी आभार मानले.