वार्षिक योजनांच्या मान्यतेचे अधिकार जिल्ह्यांना देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:12 PM2022-02-18T12:12:48+5:302022-02-18T12:13:18+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मांडलेले सर्व विषय अभ्यासपूर्ण असून ते राज्यस्तरावर राबवण्यासारखे आहेत अशा शब्दात मंत्री पाटील यांचे कौतुक केले.
कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनांच्या तांत्रिक मान्यतेचे अधिकार जिल्हा स्तरावर हस्तांतरित करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. शहरी लोकसंख्येचा विचार करून निधी वाटपाच्या सूत्रामध्ये बदल करणे गरजेचे आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याच्या वार्षिक योजना आराखड्यासाठी ४२५ कोटी रुपये दिले जातील.
ज्या जिल्ह्यांचा निर्देशांक, विकासाचा दर जादा आहे, त्या जिल्ह्यांना कमी निधी मिळणार नाही, अशा रीतीने निधी वाटप सूत्रामध्ये बदल करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली.
जिल्हा वार्षिक योजनांतर्गत निधी वाटपाचे निकष, तांत्रिक मान्यता, अनुज्ञेय कामे, स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करणे या विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्यात आली.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मांडलेले सर्व विषय अभ्यासपूर्ण असून ते राज्यस्तरावर राबवण्यासारखे आहेत अशा शब्दात मंत्री सतेज पाटील यांचे कौतुक केले. शासकीय इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित शासकीय रुग्णालयांचे बांधकाम विस्तारीकरण,
दुरुस्ती व औषधसाठा यासाठी निधी उपलब्ध करून देणे, राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेतून २-४-६ संकरित दुधाळ गायी-म्हैशी गट वाटप योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ तालुक्यांचा समावेश करणे, पोलीस व तुरुंग विभागाला पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करणे या विषयांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगून मंत्री पाटील यांनी मांडलेल्या विषयांबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करण्याच्या सूचना दिल्या.
कोल्हापूरला अधिक निधी द्यावा : सतेज पाटील
जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २५ जानेवारीला झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यासाठी निधी वाटप निकषानुसार ४०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली होती.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी निधी वाटपाचे सध्या लागू असणाऱ्या निकषाचे सूत्र बदलून राज्याला जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या कोल्हापूरसारख्या जिल्ह्यांना अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना करून कोल्हापूर जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक जास्त असल्यामुळे जिल्ह्याला कमी निधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले होते.