कोल्हापूर : ‘मोरया मोरया,’ ‘गणपती बाप्पा मोरया...’चा जयजयकार आणि मोठ्या साउंड सिस्टमसह ढोल-ताशांच्या गजरात बुधवारी सायंकाळी शहरातील गणेश मंडळांच्या राजांचे आगमन झाले. काही मंडळांच्या गणेशमूर्ती लवकर तयार न झाल्याने रात्री उशिरापर्यंत ‘श्रीं’चे आगमन सुरू होते.
साउंड सिस्टीमचा दणदणाट, फॉग मशीनच्या धुरातील अत्याधुनिक लेसर शोचा झगमगाट, एलइडी लाइटचा थरार आणि रिपरिप पावसातही विविध गाण्यावर बेधुंद होऊन नाचणाऱ्या तरुणाईने राजारामपुरी परिसरातील सार्वजनिक मंडळांनी जल्लोषी वातावरणात गणेश आगमन मिरवणूक काढली. सुमारे ३६ हून अधिक सार्वजनिक मंडळांनी सहभाग घेतल्याने रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक सुरू होती.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे शांततेत झालेल्या गणेशोत्सवातील सर्व निर्बंध उठवले. त्यामुळे यंदा राजारामपुरीतील श्री गणेश आगमन मिरवणूक जल्लोषात होती, हे निश्चित होते. त्या पार्श्वभूमीवर शाळा नंबर ९ येथून मिरवणूक प्रारंभ होता. त्यासाठी अनेक मंडळे त्या ठिकाणी येऊन थांबली होती, पण सायंकाळी साडेपाच वाजता राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते जनता बाजार चौकात श्रीफळ वाढवून मुख्य मार्गावरच मिरवणुकीचा प्रारंभ झाला. त्यामुळे जगदाळे हॉल मार्गावर अनेक मंडळे बराच वेळ अडकून पडली होती.
बहुतांश सर्वच मंडळांनी साउंड सिस्टीम, डोळे दीपणारा एलइडी लाइट तसेच फोग मशीनमधील धुरामध्ये अत्याधुनिक लेसर शोच्या थराराचे नियोजन केले होते. जनता बाजार चौकात बहुतांश मंडळांनी फटाक्यांची आतषबाजी केली. पोलीस खात्याने साउंडला मर्यादा पाळण्याच्या दिलेल्या सूचनांना तिलांजली देत सर्वच मंडळांचे साउंड सिस्टीमचा आवाज कानठळ्या बसणारा होता.
सायंकाळनंतर पावसाने रिपरिप सुरू केली, त्याच परिस्थितीत साउंड सिस्टीमच्या गीतावर तरुणाई बेधुंद होऊन हातात विविध रंगांचे झेंडे घेऊन नाचत होती. त्यामुळे मार्गावर मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
महिलांचाही सहभाग
अनेक मंडळांमध्ये तरुणांसह महिला व युवती डोक्यावर फेटे घालून नऊवारी साडी नेसून मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
पारंपरिक वाद्ये गायब
संपूर्ण मिरवणुकीत सर्वच मंडळांंनी साउंड सिस्टीम व लाइट सिस्टीमवर भर दिल्याने पारंपरिक वाद्येच गायब होती. त्यामुळे वाद्याचा सूर पूर्ण मिरवणुकीत दिसून आलाच नाही.
मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी
सायंकाळनंतर पावसाची रिपरिप सुरू झाली होती, तरीही ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. पावसाचा काहीसा जोर वाढल्यानंतर नागरिकांनी दुकान व झाडांचा अडोसा घेतला.
सुवर्णअलंकारीत गणेश मूर्तीने लक्ष वेधलेजनता बाजार चौकात एस. एफ. (गणेश) फ्रेंडस सर्कलच्या सुवर्णअलंकारीत गणेश मूर्तीचे उद्घाटन झाले. यावेळी शोभेच्या दारुची नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली. ही आतषबाजी मोबाइलमध्ये टिपण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
पोलीस बंदोबस्त..
संपूर्ण मिरवणुकीत मार्गावर अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे आदी अधिकारी फिरून मंडळांना पुढे जाण्यासाठी आवाहन करत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
जोरदार पावसाने तारांबळ
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी पावसाने झोडपून काढले. तब्बल पाऊण तास एकसारखा पाऊस राहिल्याने गणेश आगमन मिरवणुकीवर परिणाम झाला. साउंड सिस्टमसह गणेशमूर्ती झाकण्यासाठी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती.