जोतिबा : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी जोतिबा डोंगर येथे हिम्मत बहाद्दर चव्हाण यांच्या मानाच्या सासनकाठीचे दिमाखात आगमन झाले. १२ एप्रिलला येथे चैत्र यात्रा होत आहे. या यात्रेत ज्या सासनकाठ्या सहभागी होत असतात, त्यात डोंगरावर प्रथम येण्याचा मान निगवे दुमाला येथील हिम्मत बहाद्दर चव्हाण यांच्या सासनकाठीला आहे.गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा मंदिरामध्ये रविवारी पंचांग वाचन करण्यात आले. येथील संजय ठाकरे यांच्या हस्ते पंचांगाचे पूजन करून केरबा उपाध्ये यांनी ग्रामस्थांच्या आणि भाविकांच्या उपस्थितीत पंचांग वाचले. यानंतर कडुनिंबाचे वाटप करण्यात आले. दुपारी १२ वाजता निगवे दुमाला येथील हिम्मत बहाद्दर चव्हाण यांच्या मानाच्या सासनकाठीचे जोतिबा मंदिरात आगमन झाले. यावेळी पुजाऱ्यांच्या हस्ते सासनकाठीची विधिवत पूजा करून सदरेवर प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी रणजितसिह चव्हाण, संग्रामसिह चव्हाण यांच्यासह भाविक उपस्थित होते. दरम्यान, आज पहाटे चार वाजता घंटानाद करून मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी संपन्न झाले. जोतिबाची दख्खनच्या राजाच्या स्वरूपातील अलंकारी बैठी पूजा बांधण्यात आली होती.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगरावर मानाच्या सासनकाठीचे आगमन, १२ एप्रिलला चैत्र यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:56 IST