कोल्हापूर : रस्ते विकासामध्ये चर्चेचा विषय ठरलेला ‘बास्केट ब्रिज’ पुन्हा लांबणीवर पडला आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बरोबर एक वर्षापूर्वी या ब्रिजची पायाभरणी झाली. परंतु पुलाची शिरोलीजवळ पिलरचा सव्वाचार किलोमीटरचा नवा फ्लाय ओव्हर ब्रिज बांधण्याचा निर्णय झाल्याने साहजिकच बास्केट ब्रिज किमान तीन वर्षांसाठी लांबणीवर पडला. राजकीयदृष्ट्या चर्चेचा ठरलेला हा ब्रिज कधी होतोय याची कोल्हापूरकरांनाही उत्सुकता आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या पायाभरणीचे पुढे काय झाले हे ‘लोकमत’ने तपासले.याआधीच्या पुराचा अभ्यास करून महापुरात संपर्क तुटू नये आणि कोल्हापूर शहराचे वेगळेपण दिसावे आणि राष्ट्रीय महामार्गावरून पुण्या-मुंबईहून येणाऱ्या नागरिकांना थेट कोल्हापूर शहरात विनासायास प्रवेश मिळावा म्हणून पाच वर्षांपूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी बास्केट ब्रिजची संकल्पना मांडून तो मंजूरही करून घेतला. पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरोली येथून शहरात येण्यासाठी या बास्केट ब्रिजची सुरुवात होणार होती.महापुरातही कोल्हापूरच्या संपर्क तुटणार नाही
- दीड किलोमीटरच्या या पुलासाठी १८० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. महाडिक भाजपकडून राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा बास्केट ब्रिजच्या कामाचा पाठपुरावा केला आणि वर्षभरापूर्वी दि. २८ जानेवारीला मंत्री गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजनही केले.
- बास्केट ब्रिजमुळे महापुराच्या काळात कोल्हापूर शहराचा संपर्क तुटणार नाही, असे मंत्री गडकरी यांनी भाषणात जाहीर केले.
- परंतु नंतर पुन्हा जूनमध्ये महापुराच्या काळात शिरोलीजवळून पिलरचा नवा पूल बांधण्याची आग्रही मागणी नागरिकांनी लावून धरली. याची दखल लोकप्रतिनिधींनाही घ्यावी लागली. परिणामी आधीचे नियोजन रद्द झाले.
- आता शिरोलीपासून सुरू होऊन उचगाव फाट्याजवळ खाली उतरणारा सव्वाचार किलोमीटरचा फ्लाय ओव्हर ब्रीज करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. याच रस्त्यांवर बास्केट ब्रिज आधारित असल्यामुळे साहजिकच या पुलाचेही बांधकाम आता लांबणीवर पडले.
नागरिकांच्या मागणीस्तव महापुराचे पाणी निचरा होण्यासाठी पिलरचा मोठा पूल उभारण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. याच रस्त्यांवर बास्केट ब्रिज असल्याने साहजिकच या नव्या पुलाचे बांधकाम करतानाच हा पूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम लांबणीवर पडले आहे. जुन्या नियोजनानुसार आतापर्यंत पुल झाला असता. परंतू लोकहितास्तव या ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रीज होणार असून, त्यातच बास्केट ब्रिजच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. - धनंजय महाडिक, खासदार