कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐतिहासिक व धार्मिक, पौराणिक घटनांचा साक्षीदार असलेल्या जीवनदायिनी पंचगंगगा नदी घाटाचे सौंदर्य आता अधिक खुलणार आहे. नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेतून दोन कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीतून येथे विकासकामे होणार असून शुक्रवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या विकासकामांचा नारळ फोडला. यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी कोल्हापूरचा जयपूरच्या धर्तीवर सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा पुनरुच्चार करत पंचगंगा घाटावरील विकास व संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यावर घाटाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे तसेच अधिकारी उपस्थित होते.केसरकर म्हणाले. औद्योगिक आणि कृषी विकासाबरोबरच ऐतिहासिक जिल्हा म्हणून कोल्हापूरचा विकास आवश्यक आहे. राज्यासह देशभरातील प्रत्येक नागरिकाने कोल्हापूरला आले पाहिजे या दृष्टीने विकासावर भर दिला जात आहे. पंचगंगा घाट हे कोल्हापूरचे सौंदर्य आहे. त्यासोबतच जुना राजवाडा ते नवा राजवाडा मार्ग, अंबाबाई मंदिर परिसर विकासाची कामे टप्प्याटप्प्याने केली जातील. जिल्हाधिकारी राहुल रेखावार व आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या सहकार्याने शहराचा विकास गतीने केला जाईल.
कोल्हापुरातील पंचगंगेचा घाट खुलणार..हेरिटेज लुक येणार; २ कोटी २० लाखांचा निधी
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 08, 2023 6:11 PM