कोपार्डे : रंगपंचमी साजरी करुन शिंगणापूर (ता. करवीर) बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेले कोल्हापूर येथील दोघे तरुण पाण्यात बुडाल्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. आज, गुरुवारी या दोन्ही तरूणांचे मृतदेह हाती लागले. अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्नानंतर मृतदेह शोधण्यात यश आले.सकाळी साडे आठ वाजता गुरुप्रसाद गजानन झगडे ( रा. शनिवारपेठ) याचा मृतदेह मिळाला. तर दुपारी एक वाजता सुनील सुरेश शिंदे (रा. यादवनगर) याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना नदी काठावरील लोकांना दिसला. दोन्ही मृतदेह करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.याबाबत माहिती अशी, मंगळवारी (दि.२२) रंगपंचमी खेळून गुरुप्रसाद मित्रांसमवेत शिंगणापूर बंधाऱ्याजवळ आंघोळीसाठी आला होता. येथे मित्रांसोबत जेवण केल्यानंतर तो घरी काम असल्याचे सांगून लवकर निघून आला होता. पण रात्री उशिरापर्यंत तो घरी पोहचला नव्हता. त्याच्या नातेवाईकांनी गुरुप्रसादच्या मोबाईलवर संपर्क करत सर्वत्र शोधाशोध केली होती. दरम्यान त्याची कपडे व मोटर सायकल बंधाऱ्याजवळ आढळल्याने तो बुडाल्याची शक्यता ओळखून काल, बुधवारी व आज रेस्क्यू ऑपरेशन फोर्स व अग्निशमन दलाने शोध मोहीम सुरू केली. अन् आज सकाळी साडे आठ वाजता त्याचा मृतदेह सापडला.तर यादवनगरातील तरुण सुनील शिंदे हाही मित्रांसोबत शिंगणापूर बंधाऱ्यावर आंघोळीसाठी आला होता. तोही रात्री उशिरापर्यंत घरी पोहचला नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली. त्याचे कपडेही नदी काठावर बंधाऱ्याजवळ आढळले. आज, दुपारी सुनीलचाही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.
'त्या' दोन तरुणांचे मृतदेह सापडले, रंगपंचमी खेळून शिंगणापूर बंधाऱ्यावर गेले होते आंघोळीला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 4:14 PM