कोल्हापूर : जैविक आणि सेंद्रीय शेतीसाठी लागणारी औषधे, बियाणे, खतांच्या विक्रीसाठी आवश्यक दुकान परवाना मंजूर करण्यासाठी नऊ हजारांची लाच घेणाऱ्या कृषी अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. राजर्षी शाहू मार्केट यार्ड परिसरात मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ही कारवाई झाली. सुनील जगन्नाथ जाधव (वय ५०, सध्या रा. जाधववाडी, कोल्हापूर, मूळ रा. शाहूपुरी, सातारा) असे अटकेतील वर्ग दोनच्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जैविक आणि सेंद्रीय शेतीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. या शेतीसाठी आवश्यक असलेली बियाणे, खते आणि औषधांची विक्री करण्यासाठी दुकानाचा परवाना मिळावा, अशी मागणी त्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने जिल्हा कृषी कार्यालयाकडे केली होती.संबंधित अर्ज मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठवल्याबद्दल वर्ग दोनचे कृषी अधिकारी सुनील जाधव याने तक्रारदारांकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती नऊ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास राजर्षी शाहू मार्केट यार्ड परिसरात लाच घेताना जाधव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.पथकाने जाधव याच्या जाधववाडी येथील घराची झडती घेतली. तसेच सातारा येथील घराची झडती घेण्यासाठी पथक रवाना केले आहे. पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर यांच्यासह अजय चव्हाण, विकास माने, सचिन पाटील, सुधीर पाटील, विष्णू गुरव यांच्या पथकाने कारवाई केली.
ऐनवेळी ठरवले ठिकाणजाधव याचे लाच घ्यायचे ठरले, मात्र ठिकाण नक्की होत नसल्याने तक्रारदार आणि लाचलुचपत प्रतिबंधकचे पथकही खोळंबले होते. अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास जाधव याने मार्केट यार्ड परिसरात तक्रारदारास बोलवले. त्या ठिकाणीही एसीबीचे पथक पोहोचल्यामुळे जाधव याचे बिंग फुटले.
तक्रारी करण्याचे आवाहनकोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या ढ़वतीने एजंटद्वारे शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार द्यावी, असे आवाहन उपअधीक्षक नाळे यांनी केले आहे.