कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीनंतर सात महिन्यानंतर शेंडा पार्क येथील कुष्ठधामच्या वास्तूला रविवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत कार्यालयासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडी इमारतीचे तसेच अंतर्गत भागाचे नुकसान झाले.यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गांजा ओढणाऱ्यांच्या टोळक्यामुळेच ही आग लागल्याचा प्राथमिक संशय असला तरी सामाजिक कार्यकर्त्यांनी घातपाताचा संशयही व्यक्त केला आहे. या इमारतीत एकच विजेचा बल्ब आहे. या ठिकाणी कोणीही राहावयास नसल्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सध्या या जागेचा ताबा आहे. नेमके नुकसान काय झाले, याबाबतची माहिती त्यांनी अजूनही पोलिसांकडे सादर केलेली नाही. या ठिकाणी काही कागदपत्रे होती का, जळालेल्या वस्तूंमध्ये इतर काही महत्त्वाच्या वस्तू होत्या का, याबाबत पोलिस तपास करत आहेत. त्यामुळे सोमवारी उशिरापर्यंत याप्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यात आलेली नाही.शेंडापार्कची ही दुमजली कार्यालयीन इमारत दगडी आहे. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिनाही आहे. आत असलेल्या कागदांमुळे, कापडांमुळे पेट घेतला असावा. या ठिकाणी आगीमुळे इमारतीसाठी वापरलेल्या लाकडी साहित्याचा कोळसा झाला आहे. अग्निशमन दलाने पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला असला, तरी आग बऱ्याच काळानंतर विझली.ओसाड परिसरजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे जरी ही जागा असली तरी आता हा संपूर्ण परिसर ओसाड आहे. तो चोर, गुंड आणि गांजाकश मवाल्यांच्या ताब्यात असतो. येथे सुरक्षा रक्षकही नाहीत. शेंडापार्क येथे असलेले हे कुष्ठधाम बंद करण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू असल्यामुळे या माध्यमातून येथे असलेला भूखंड लाटण्याचा प्रयत्न बड्या धेंड्यांकडून सुरू आहे, असा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
Kolhapur: शेंडापार्कातील कुष्ठधामची वास्तू जळाली; भूखंड लाटण्याचा प्रयत्न असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:08 IST