कोल्हापूर : जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर, गुलाल खोबऱ्याची उधळण, गगनचुंबी सासनकाठीचा तोल सांभाळत लयबद्ध नृत्य, हलगीचा कडकडाट, पालखी सोहळा, यमाईचा विवाह, मिरवणूक आणि भाविकांच्या अलोट गर्दीत दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा बुधवारी अभूतपूर्व उत्साहात पार पडली. कोरोनानंतर गेल्यावर्षीच्या यात्रेला बिचकत आलेल्या यात्रेकरूंनी यंदा मात्र होऊ दे यात्रा.. म्हणत डोंगरावर अलाटे गर्दी केली. वेगवेगळ्या राज्यातून लहानमुलांपासून वयोवृद्धांपर्यंत, तरुणांपासून बायाबाप्यांपर्यंत लाखो भाविक श्रीमंत, गरीब, लहान-मोठा सगळे भेदाभेद विसरून जोतिबाच्या गुलाली भक्तीत रंगून गेले. नजर जाईल तिथे फक्त गुलाल आणि भक्तीरसात रंगलेले भाविक होते. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सासनकाठ्यांचे पूजन झाले.महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रसह देशभरातील भाविकांचे कुलदैवत, श्रद्धास्थान असलेल्या श्री जोतिबाची चैत्र यात्रा हा वर्षातला सर्वात मोठा साेहळा. आयुष्यातले सगळे दु:ख, ताणतणाव विसरून भाविक देवाच्या चरणी लीन होतात. गेल्या चार दिवसांपासून डोंगरावर सुरू असलेल्या भक्तीचा बुधवारी परमोच्च बिंदू होता. यात्रेनिमित्त पहाटे ३ वाजता घंटानाद, काकड आरती, पाद्यपूजा, मुखमार्जन विधी झाले. त्यानंतर पन्हाळा प्रांताधिकारी अमित माळी यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. त्यानंतर देवाची राजदरबारी बैठी अलंकार महापूजा बांधण्यात आली. दुपारी एक वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचे पूजन झाले. यावेळी राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभुराज देसाई, आमदार सतेज पाटील, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते सासनकाठीचे पूजन झाले.यावेळी पल्लवी केसरकर, सोनाली केसरकर, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, पन्हाळा तहसिलदार रमेश शेंडगे, जोतिबा मंदिराचे व्यवस्थापक दीपक म्हेतर यांच्यासह मानकरी उपस्थित होते. सायंकाळी साडेपाच वाजता तोफेच्या सलामीने देवाचा पालखी सोहळा सुरू झाला. सुर्यास्तानंतर यमाई (रेणुका) देवी व जमदग्नीचा विवाह सोहळा झाला. त्यानंतर देवाचा पालखी सोहळा पूर्ण झाला.तीन वर्षातील उच्चांकी गर्दीकोरोनामुळे दोन वर्षे यात्रा झाली नाही. गेल्यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच यात्रा झाल्याने यात्रेकरूंची संख्या कमी होती. यंदा मात्र तीन वर्षातील कसर भरून काढत होऊ दे यात्रा म्हणत लाखो भाविकांनी देवाच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली. दुचाकी, चारचाकी, बैलगाड्या, ट्रॅक्टर, ट्रॉली, टेंम्पो, ट्रॅव्हलर, बसेसने भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे गेल्या चार दिवसांपासून डोंगरावर येत होते.
Kolhapur- भक्तीच्या गुलालाचा 'जोतिबा यात्रेला' चढला रंग, तीन वर्षातील उच्चांकी गर्दी
By इंदुमती सूर्यवंशी | Published: April 05, 2023 4:55 PM