राजाराम लोंढेकोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची वाताहात झाली असून प्रत्येक पंचवार्षिकमध्ये आमदारांची संख्या घटत चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चा एकमेव आमदार असून पक्ष फुटीनंतर घड्याळ्याचे विस्कटलेले काट्याना योग्य दिशेवर आणून कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे आव्हान मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर राहणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद मर्यादित आहे, सत्तेविना पक्ष मजबूत करण्याचे कसब जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांना दाखवावे लागणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच काेल्हापूर जिल्ह्यात झाली, स्थापनेनंतर अवघ्या चार महिन्यांत झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले. पाच आमदार आणि दोन खासदार पक्षाचे विजयी झाले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्थांवर पक्षाचा झेंडा राहिला. पश्चिम महाराष्ट्रात सर्वांत सुरक्षित जिल्हा म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जाते. पण, २००९ नंतर पक्षाला गळती लागत गेली तर थांबली नाही.गेल्या दहा वर्षांत पक्षाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. खासदार सोडाच आमदारांची संख्या दोन वर आली. दोन वर्षांपूर्वी पक्षाच्या फुटीनंतर मंत्री हसन मुश्रीफ, राजेश पाटील, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, मानसिंगराव गायकवाड यांच्यासह दिग्गज नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले. पण, विधानसभेच्या तोंडावर के. पी. पाटील यांनी ‘मशाल’ हातात घेतली, तर ए. वाय. पाटील यांनी पक्षाला रामराम केले व जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड यांनी उद्धवसेनेसोबत जाणे पसंत केल्याने पक्षाचे अस्तित्व ‘कागल’ व ‘चंदगड’ मतदारसंघापुरतेच मर्यादित राहिले.या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ हे निवडून आले. पण राजेश पाटील यांचा पराभव झाल्याने पक्षाच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभा राहिला. पक्षाच्या घड्याळ्याचे विस्कटलेले काटे योग्य दिशेवर आणून मजबुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना सामोरे जाण्याचे आव्हान मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर राहणार आहे.राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करत बांधणी केली असली तरी विधानसभा निवडणुकीत तिन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघासह इतर ठिकाणी कार्यकर्त्यांना ताकद देऊन नव्याने बांधणी करावी लागणार आहे.
‘के. पीं’च्या हातावर पुन्हा ‘घड्याळ’?
राजकीय तडजोड म्हणून के. पी. पाटील यांनी हातात ‘मशाल’ घेतली असली तरी जिल्ह्यातील आगामी राजकारणात ते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाबेतच राहण्याची शक्यता आहे.‘ए. वाय.’ यांना ‘कमळा’चा मोहविधानसभेतील पराभवानंतर ए. वाय. पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांनी पुन्हा पक्षात यावे, यासाठी प्रयत्नही सुरू झाले आहेत. पण, त्यांचा ‘कमळा’चा मोह पाहता, राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता धूसर आहे.
उमेदवार - मतेराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
- हसन मुश्रीफ (कागल) - १,४५,२६०
- राजेश पाटील ( चंदगड) - ६०,१२०
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
- समरजीत घाटगे (कागल) - १,३३,६८८
- मदन कारंडे (इचलकरंजी) - ७५,१०८
- नंदिनी बाभूळकर (चंदगड) - ४७,२५९