जोतिबा : महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी-रत्नागिरी (ता.पन्हाळा) येथील श्री जोतिबा देवाच्या मूळ मूर्तीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात झाली. शनिवार(दि. २५)पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असून, भाविकांना या काळात उत्सवमूर्ती व प्राणकलशाचे दर्शन घेता येईल.श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील देवाची मूळ मूर्ती प्राचीन आणि दगडी आहे. गतवर्षी या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्त्व विभाग यांना मूर्तीची पाहणी करून अहवाल देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. या अहवालानुसार श्री जोतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार, मंगळवारपासून श्री जोतिबाच्या मूळ मूर्तीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरवात झाली. यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री जोतिबाच्या मूर्तीचे संवर्धन सुरू असल्याने भाविकांना जोतिबाच्या उत्सव मूर्तीचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Kolhapur: जोतिबा मूर्तीच्या संर्वधन प्रक्रियेला प्रारंभ, भाविकांना घ्यावे लागणार उत्सवमूर्तीचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:32 IST