कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पेड पास दर्शनाला आज, शुक्रवारी दिवाणी न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. २६) स्थगिती दिली. पुजारी गजानन मुनिश्वर यांनी याबाबत देवस्थान समितीच्या विरोधात दावा दाखल केला होता.नवरात्रोत्सवात देवस्थान समितीकडून अनेक नागरिकांना व्हीआयपी दर्शनासाठी सोडले जाते. त्यासाठी दबावदेखील टाकला जातो. तसेच ज्या नागरिकांना रांगेत थांबायचे नाही त्यांच्यासह सर्वांच्याच सोयीसाठी देवस्थान समितीच्यावतीने माणसी २०० रुपये याप्रमाणे पेड पास काढण्यात येणार होते. मात्र याविरोधात पुजारी गजनान मुनिश्वर यांनी गुरुवारी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानुसार आज, शुक्रवारी दुपारी तिसरे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सिंघेल यांच्यासमोर सुनावणी झाली.कायम विरोधच का?देशातील महाराष्ट्रातील अनेक मोठ्या देवस्थानांमध्ये पेड पासची सोय आहे. तिथे आजवर कधी अशा प्रकारचा विरोध होत नाही. सर्वांच्या सोयीसाठी एखादी व्यवस्था लावली जात असेल तर तिचा सकारात्मक स्विकार करण्याऐवजी विरोधच ही पद्धत रुढ झाली आहे. देवस्थान समितीला सर्वाधिक त्रास व्हीआयपी दर्शनाचा होतो. अनेकदा समितीचे कर्मचारी, सुरक्षारक्षक, दुकानदार अगदी पोलीससुद्धा पैसे घेत असल्याचा अनुभव आहे. पुजारीदेखील अभिषेकाच्या भक्तांना थेट दर्शनासाठी घेऊन जातात, देवस्थान असो नाही तर पूजारी सगळ्यांकडून येणाऱ्या भाविकांनी पेड पास काढून दर्शन घेणे सर्वांसाठी सोयीचे होते.
कोल्हापूर: अंबाबाईच्या 'पेड पास'ला दिवाणी न्यायालयाची स्थगिती
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 23, 2022 6:40 PM