कोल्हापूर : खोची (ता. हातकणंगले) येथील सहा वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी आरोपी बंडा ऊर्फ प्रदीप दिलीप पोवार (वय ३०, रा. खोची) या नराधमाला न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरविले. प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश वृशाली जोशी यांच्यासमोर याची सुनावणी सुरू आहे.
नात्याला कलंक लावणारी घटना असल्याने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव - पाटील यांनी केली. खटल्याचा निकाल सोमवारी ठेवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह जिल्ह्याचे या खटल्याकडे लक्ष लागून होते.
दि. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी खोची येथील सहा वर्षांच्या बालिकेचे घरातून अपहरण करून गावातच निर्जनस्थळी तिच्यावर लैगिक अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या केल्याचा आरोप बंडा ऊउर्फ प्रदीप पोवार याच्यावर होता.
न्यायालयाने आरोपी पोवारला सर्व खटल्यात दोषी ठरवले. सुमारे सव्वा तासाच्या युक्तिवादात विशेष सरकारी वकील ॲड. यादव-पाटील यांनी घटनाक्रम समोर ठेवून सर्वोच्च न्यायालयातील आठ विविध खटल्यांच्या निकालाचा आधार घेतला. आरोपीने दाखविलेले कौर्य यामुळे ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. बचाव पक्षातर्फे वकिलांनी युक्तिवादात, काही निवाड्यांचा आधार घेत, आरोपीचे वय, वृध्द वडील, कौटुंबिक परिस्थिती याचा विचार करून कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी न्यायालयाला विनंती केली.
२२५ पानांचे दोषारोपपत्रघटनेनंतर महिन्यातच वडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक संतोष घोळवे यांनी सखोलपणे तपास करून २२५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. मार्चपासून अवघ्या १२ कामकाजाच्या सुनावणीत खटल्याचे कामकाज पूर्ण केले. खटल्यात चार साक्षीदार, पंच, घटनास्थळाचा पंचनामा, शवविवच्छेदन अहवाल, आरोपीने कलम २७ खाली दिलेली माहिती, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल तसेच वस्तुनिष्ठ पुरावे न्यायालयात सादर केले.
निकाल ऐकण्यासाठी खोची पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दीघटनेनंतर आरोपीविरोधात उद्रेक झाला होता. त्यामुळे खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी गुरुवारी खोची पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. प्रत्येकाला शिक्षेबाबत उत्सुकता होती.
आरोपी पोलीस बंदोबस्तात
सुनावणीपूर्वी आरोपी बंडा पोवार याला पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणले. कामकाज सुरू झाल्यानंतर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. तो निगरगट्टपणे पिंजऱ्यात उभा होता. सुनावणी संपल्यानंतर नागरिक त्याच्यावर कोणताही राग काढू नयेत, म्हणून ग्रामस्थांची न्यायालयाबाहेरील गर्दी ओसरल्यानंतर आरोपीला पोलीस बंदोबस्तात कारागृहात नेण्यात आले.
घटनाक्रम...
- ३१ ऑक्टोबर २०२१ - भर दिवसा बालिकेचे अपहरण, लैंगिक अत्याचार, हत्या
- ३१ ऑक्टोबर - सायंकाळी बालिकेचा मृतदेह मिळाला
- १ नोव्हेंबर - पहाटे आरोपी बंडा ऊर्फ प्रदीप दिलीप पोवार याला अटक
- ४ डिसेंबर - आरोपीविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
- १७ मार्च २०२२ - मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती.
- २२ मार्च - खटल्याची सुनावणी सुरू.
- २८ मार्च - आरोपीला न्यायालयाने ठरवले दोषी.