कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील लेखाधिकाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार राजारामपुरी पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणाचे मूळ कारण पोलिस शोधणार आहेत. निधीचा अपहार की अन्य काही कारणांमुळे अपहरण केले आहे, याचा तपास सुरू आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहाराच्या निधीच्या अपहारावरून लेखाधिकारी दीपक बाळासाहेब माने (वय ४४, रा. नागाळा पार्क) यांना मोटारीतून नेऊन मारहाणीची घटना बुधवारी घडली होती. २३ लाखांच्या अपहार कबूल करण्यासाठी कोयत्याचा धाक दाखवून हे कृत्य केल्याचा प्रकार समोर आला.या प्रकरणी इंद्रजीत मारुती साठे (वय ३८, रा. कळंबा), संग्राम दिनकर जाधव (४२, रा. शुक्रवार पेठ), उत्तम आनंदा भोसले (३०, रा. पाटपन्हाळा), प्रकाश महिपती मिसाळ (३२, मिसाळवाडी, राधानगरी), संदीप मधुकर ठमके (४०, रा. जुना बुधवार पेठ), महादेव कृष्णा मेथे (४६, रामानंदनगर), मंगेश तुकाराम जाधव (४२, रा. पापाची तिकटी), प्रसाद संजय आमले (३१, रा. बागल चौक) अशी अटक केलेल्या संशयित आहेत.राजारामपुरी पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी माने हे जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागात काम करतात. मुख्य संशयित इंद्रजीत साठेची पत्नी डाटा ऑपरेटर म्हणून या ठिकाणी काम करते. शालेय पोषण आहाराच्या स्वयंपाक मदतनीस मानधन निधीतील २३ लाखांचा अपहार झाल्याची माहिती साठे याला मिळाली होती. हा अपहार माने यांनी स्वतः केल्याचे कबूल करून १० लाख रुपये देण्याची मागणी संशयित साठे याने केली.बुधवारी माने टाकाळा येथे इलेक्शन ड्यूटीवर असलेल्या ठिकाणी येऊन त्यांना अपहाराबाबत चर्चा करण्याचे कारण सांगून मोटारीतून टेंबलाईवाडी परिसरात नेले. प्राथमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक संशयित संदीप ठमकेदेखील सोबत होता.
Kolhapur: लेखाधिकारी मारहाणप्रकरणी संशयितांना पोलिस कोठडी, अपहाराचे मूळ कारण शोधण्याचे पोलिसांचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 3:43 PM