कोल्हापूर : देशातील बेरोजगारी, महागाई, वांशिक दंगली, फोडा आणि झोडा नितीचा वापर, द्वेषाचे राजकारण, दिशाभूल करण्यावर दिला जाणारा जोर या सगळ्या गोष्टींचा सर्वसामान्य जनतेला कंटाळा आला असून भाजप सरकारची सर्वसामान्यातील विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, अशी टीका माजी गृह राज्यमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.ऐन गणेशोत्सवाच्या काळात लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. त्याचा अजेंडाही अजून प्रसिध्द केलेला नाही. विरोधी पक्षाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही. यातून भाजप सरकारची एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. जनसंवाद यात्रेच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.काँग्रेसचे नेते राहूल गांधी संपूर्ण देशभरात बंधुभाव, प्रेमाचे वातावरण तयार करुन जनतेला विश्वास देत असताना दुसरीकडे भाजप सरकारने मात्र द्वेशाचे, सुडाचे राजकारण सुरु केले. सर्व पातळीवर भाजप सरकार फेल झाल्यामुळे फोडा-झोडा निती, दिशाभूल करण्याचे प्रकार सुरु केले आहेत. कोणत्याही गंभीर विषयावरुन भरकट नेण्यासाठी भारत की इंडिया यासारखे मुद्दे चर्चेत आणून लोकांचा गुंतवून ठेवले जात आहे, असे पाटील म्हणाले.मणिपूर मधील दंगलीमुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे. जगात आपली मान खाली घालावी लागली. दंगली होणार आहेत याची पूर्वकल्पना मिळत असूनही खबरदारी घ्यायची, कारवाई करायची मानसिकता केंद्र सरकारची दिसत नाही, असे पाटील यांनी सांगितले.
भाजप सरकारची विश्वासार्हता संपुष्टात, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका
By भारत चव्हाण | Published: September 07, 2023 4:30 PM