कोल्हापूर : केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील बाळ दत्तक देण्याचा पहिला आदेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोरच्या सुनावणीनंतर झाला. येथील बालकल्याण संकुलातील नऊ महिन्यांची मुलगी मुंबईतील बोरिवलीतील एका दाम्पत्यास दत्तक देण्यात आली. नव्या आदेशानुसार ही प्रक्रिया सुलभ झाली.
कोणत्याही पालकास मुलगा किंवा मुलगी दत्तक घ्यायची असल्यास केंद्रिय दत्तक ग्रहण प्राधिकरण (सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ॲथॉरिटी - कारा) या संस्थेकडे नावनोंदणी करावी लागते. तिथे नाव नोंदणीनंतर ज्या संस्थेत दत्तक देण्यासाठी बाळ उपलब्ध आहे, त्या संस्थेकडे कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यानंतर दत्तक देण्यासंबंधीचा आदेश जिल्हा न्यायालयात होत असे. परंतु न्यायालयाकडे त्यांची अन्य कामे जास्त असल्याने हे आदेश होण्यास फारच विलंब लागे. त्यामुळे मूल दत्तक घेण्याऱ्या पालकांची अस्वस्थता वाढत असे.
ही बाब काराच्या लक्षात आल्यावर त्यांनी या प्रक्रियेत बदल केला व सुनावणी घेऊन दत्तक देण्यासंबंधीचा आदेश देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली. त्यानुसार बालदिनाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली सुनावणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतली व मुलगी दत्तक देण्याचा आदेश केला. त्यानुसार जिल्ह्यातील पहिले बाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दत्तक देण्यात आले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी शिल्पा पाटील, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सागर दाते, संस्थेच्या अधीक्षिका मीना कालकुंद्री यांनी त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत केली.