आजरा : गवारेड्यांच्या झुंजीत एका गव्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना आजरा कोल्हापूर रस्त्यावरील मसोबा जवळील सुलगांव जंगलक्षेत्रात रस्त्याकडेला घडली आहे. घटनास्थळी झुडपे व वेली मोडून पडल्या आहेत. गवारेडा मयत झाल्याची माहिती समजताच नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.गवा रेड्यांचा कळप सुलगाव जंगल व रोपवाटिका परिसरात आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दोन गव्यांची झुंज लागल्याचे काही नागरिकांनी पाहिले. मात्र भितीने ते त्याठिकाणी न थांबताच निघून गेले. दहाच्या सुमारास त्यातील एक गवा मृतावस्थेत पडल्याचे नागरिकांनी पाहिले. तातडीने याची माहिती वन विभागाला देण्यात आली.
वन विभागाचे वनपाल बाळेश न्हावी, कृष्णा डेळेकर यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. व पशुधन अधिकाऱ्यांना शवविच्छेदन करण्याबाबत विनंती करण्यात आली. दुपारी २ वा. पशुधन अधिकारी डॉ.ढेकळे यांनी घटनास्थळी भेट देऊन गवारेड्याचे शवविच्छेदन केले.मृत गवारेडा हा ७ ते ८ वर्षांचा असावा. त्याचे डोळे लालसर व पूर्ण पांढरे झाल्यामुळे त्याला कमी दिसत असावे. त्यातच त्याला न्यूमोनियाही झाला होता. अशक्त झाल्यामुळेच झुंजीत त्याचा मृत्यू झाला असावा असे शवविच्छेदनानंतर डॉ. ढेकळे यांनी सांगितले. सायंकाळी उशिरा सुलगांव रोपवाटिकेत मयत गवारेड्याचे दफन करण्यात आले.