कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा समाजाच्या मागण्याबाबत शासकीय अध्यादेश काढला असला तरी तो न्यायालयीन पातळीवर टिकणार का? याबाबत उद्या, रविवारी सर्वसमावेशक चर्चा करुनच आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. अशी माहीती सकल मराठा समाजाने पत्रकातून दिली.मनोज जरांगे- पाटील हे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत होते, त्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना सुपूर्द केला. त्यामुळे एकीकडे मराठा समाजाचा जल्लोष सुरु असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात झालेला निर्णय कोल्हापुरातील मराठा समाजातील नेत्यांना मान्य नाही. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे या भूमिकेशी आम्ही आजही ठाम आहोत. गेल्या दोनवेळा शासनाकडून आरक्षणाची फसगत याचा पूर्वानुभव लक्षात घेता कालचा शासन निर्णय व त्या संदर्भातील कागदपत्रे याचा कोल्हापुरातील जेष्ठ विधिज्ञामार्फत अभ्यास होणे गरजेचा आहे. यासाठी आज, दुपारी बारा वाजता कोल्हापूर प्रेस क्लब येथे सर्वसमावेशक चर्चा करणार आहे. या चर्चेतून जो निर्णय होईल, त्यावर आंदोलनाचा पुढील दिशा ठरवली जाईल, असे पत्रकात म्हटले आहे.
अध्यादेशाचा निर्णय कोल्हापुरातील ‘सकल मराठा समाजाला’ तुर्तास मान्य नाही
By राजाराम लोंढे | Published: January 27, 2024 2:00 PM