कोल्हापूर : पेट्रोल पंप मालकाने विश्वासाने नेमलेल्या मॅनेजरनेच विश्वासघात करून मालकाला सात लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार जवाहरनगर येथील समर्थ पेट्रोल पंप येथे घडला.याबाबत पेट्रोल पंप मालक विश्वास खुशाली वराडकर (वय ४५, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, मॅनेजर शंकर माधवराव नाईक (वय ५२, रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला.राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहरनगर येथे वराडकर यांच्या मालकीचा समर्थ पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी त्यांनी शंकर नाईक याची मॅनेजरपदी नेमणूक केली होती. नाईक याने ११ जुलै ते सात नोव्हेंबर २०२३ दरम्यान २८ ऑगस्टची जमा रक्कम आणि पिग्मीची रक्कम सात लाख ८५ हजार रुपये मालकाला दिले नाहीत.
गेल्या तीन महिन्यातील जमा-खर्चाचा हिशोब तपासताना ही बाब लक्षात आली. त्यानंतर वराडकर यांनी मॅनेजर नाईक याच्या विरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.