कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर चालेल आणि महाविकास आघाडीबरोबरच राजू शेट्टींचे गणित बिघडेल, अशी अपेक्षा महायुतीच्या नेत्यांनी होती. पण, मतदारांनी ‘वंचित’ फॅक्टर चाललाच नाही. मागील निवडणुकीत ‘वंचित’च्या उमेदवारांना सव्वा लाख मते घेतली होती, पण यावेळेला डी. सी. पाटील यांना २५ हजारांच्या आतच मतदारांनी थांबवले.लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला झटका दिला होता. दहा वर्षे खासदार राहिलेले ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी यांचा ९४ हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळी ‘वंचित’च्या उमेदवाराने तब्बल सव्वा लाख मते घेतली होती. त्या प्रमाणेच यावेळेलाही मतांचे धुव्रीकरण होऊन त्याचा फायदा महायुतीला होईल, अशी खेळी भाजप-शिंदे गटाची होती. कोल्हापुरात शाहू छत्रपती यांना पाठिंबा दिला, पण हातकणंगलेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांना रिंगणात उतरून आघाडीसह राजू शेट्टी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्या दृष्टीने वंचितने प्रचार यंत्रणाही सक्रिय करून हवा तयार केली, पण ती हवा मतदान यंत्रापर्यंत पोहोचवता आली नाही. डी. सी. पाटील यांना पडलेली मते पाहता, वंचित फॅक्टर या वेळेला हातकणंगलेत निष्पभ्र ठरला असेच म्हणावे लागेल.
वंचित फॅक्टर न चालण्याची कारणे :
- मुस्लिम व मागासवर्गीय समाज एकसंध राहिला.
- उमेदवार म्हणून डी. सी. पाटील हे फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत.
- बहुरंगी लढतीत तिन्ही प्रमुख उमेदवाराकडून लावलेल्या जोडण्या प्रभावी ठरल्या.