इंदुमती गणेशकोल्हापूर : मोठा गाजावाजा करत मंजूर झालेला ८० कोटींचा करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा गेल्या तीन वर्षांपासून रखडला आहे. पहिल्या टप्प्यातील पहिल्या कामासाठी सन २०१८-१९ साली आलेल्या ८.२० कोटींनंतर मंदिरासाठी निधीच आलेला नाही. पार्किंग व भक्तनिवासाच्या बदललेल्या आराखड्याला पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीची मंजुरी मिळालेली नाही. केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेसाठी पाठवलेली फाइल अजून अजून पर्यटन विभागाकडेच अडकली आहे.वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर परिसराच्या विकासासाठी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली. म्हणून दहा वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या अंबाबाई मंदिराचा विकास आराखड्याचे काय झाले याचा शोध लोकमतने घेतला.अंबाबाई मंदिराला दरवर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच जाते, पण त्या तुलनेत सोयीसुविधांची वानवा आहे. कोल्हापुरात प्रवेश केल्यापासून त्यांच्या अडचणी सुरू होतात. मंदिराला नेमक्या कोणत्या रस्त्यांवरून जायचे. पार्किंग कुठे करायचे, ते फुल्ल असेल तर पर्यायी व्यवस्था काय?, इथून प्रश्न सुरू होतात. स्वच्छतागृहांच्या बाबतीत तर महिलांची प्रचंड आबाळ होते. राहण्यासाठी खासगी यात्री निवास व हॉटेलचा आधार घ्यावा लागतो, देवस्थानचे अन्नछत्र नाही.या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मंदिर विकास आराखडा दहा वर्षांपूर्वी बनवण्यात आला. त्यात वारंवार बदल करून तो २२५ कोटींचा झाला. अखेर पहिल्या टप्प्यासाठी मंदिराच्या ८० कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळून २०१८-१९ मध्ये ८ कोटी २० लाख रुपये आले. आराखड्यातील पहिले काम दर्शन मंडपचे होते; पण विद्यापीठ दरवाज्यासमोर दर्शन मंडप बनवण्याला विरोध झाल्याने हा निधी सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंगकडे वळवण्यात आला. या कामासाठीदेखील जवळपास ९ कोटी ४१ लाख रुपये इतका निधी लागणार होता. तो आता भक्त निवासामुळे वाढणार आहे.
निधी कधी मिळणार?मंदिरासाठी २०१९ साली मिळालेल्या ८.२० कोटीनंतर निधीच आलेला नाही. मधली दोन वर्षे तर कोरोनातच गेली. गेल्या वर्षभरात राज्याच्या सत्ताकारणातच इतक्या उलथापालखी झाल्या की अंबाबाई मंदिराकडे बघणार कोण? अशी स्थिती होती; पण आता सगळ्या गोष्टी पूर्वपदावर येऊन विकासकामे मार्गी लागत असताना अंबाबाई मंदिराच्या कामासाठी निधीची तरतूद होणे अपेक्षित आहे.
बदललेल्या प्लॅनसाठी हवी मंजुरीव्हिनस कॉर्नर येथे पुराचे पाणी येत असल्याने येथील गाडी अड्ड्यातील भक्त निवासाचा प्लॅन रद्द करून तो सरस्वती टॉकीजसमोरील पार्किंगच्यावर करण्यात येणार आहे. येथे आता ग्राऊंड फ्लोअरपासून पहिले पाच मजले पार्किंग होणार आहे. सहावा आणि सातव्या मजल्यावर भक्त निवास असेल, तेथे एकूण ४७ खोल्या, ४ डॉर्मेटरी ५० लोकांचे मोठे हॉल असणार आहे. त्यासाठी वाढीव निधी लागणार असून महापालिकेने २५ कोटींची मागणी केली आहे. या बदललेल्या आराखड्याला अजून जिल्हास्तरीय समितीची मान्यता मिळालेली नाही. या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात.
प्रसाद योजनेच्या फाइलचे पुढे काय?केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेतून तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी दिला जातो. त्यासाठी महापालिकेने पाठवलेला प्रस्ताव अजून पर्यटन विभागाकडेच धूळखात आहे. पर्यटन विभागाने प्रस्तावाची पडताळणी केली की ते शिफारस करून प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवतात, अशी त्याची प्रक्रिया आहे; पण ही फाईलदेखील पुढे गेलेली नाही.