पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळ्याच्या पायथ्याला असणाऱ्या नावलीपैकी धारवाडी येथील डोंगर भेगा पडून खचू लागल्याने भूस्खलनाचा धोका वाढला आहे. संभाव्य धोका ओळखून धारवाडीतील ४५, तर जाधववाडील ३ अशा ४८ कुटुंबांना पन्हाळा प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. भैरवनाथ मंदिराच्या भिंतींना तडे गेल्याने तेथूनच जमीन भेगाळायला सुरुवात झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.पन्हाळ्याच्या पायथ्याशी आपटीनजीक नावली गावाचा काही भाग धारवाडीत वसला आहे. धारवाडीच्या वर डोंगर, तर खाली उतार आहे. पन्हाळा परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेली भेग मंगळवारी सकाळी रुंदावताना शेतकऱ्यांना दिसली. साधारणत: अर्धा किलोमीटर अंतर डोंगर खचत जाऊन भेग पडल्याचे शेतकऱ्यांनी पन्हाळा प्रशासनाच्या लक्षात आणून दिो. त्यानंतर सायंकाळनंतर प्रशासनाने तातडीने संभाव्य धोक्याचे गांभीर्य ओळखून नावलीपैकी धारवाडीतील आणि आपटीपैकी जाधववाडीतील ४८ कुटुंबातील २२३ लोकांना जवळील देवाळे गावातील शाळेत आणि मंदिरात स्थलांतरित केले आहे.प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचेयेथील डोंगरात भूस्खलनाच्या घटना वारंवार घडत असल्याने इर्शाळवाडी किंवा माळीणसारखा प्रकार घडू नये म्हणून तालुका प्रशासनाने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अलीकडील पाच-सहा वर्षात पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या डोंगरीत भूस्खलनाचे आणि दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये मराठवाडी, धारवाडी, जांभळेवाडी आणि आपटीत भूस्खलन होण्याच्या घटना घडत आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासन अतिदक्षता आणि सतर्कतेबाबत नोटीस देण्याचे काम करते; परंतु पूर्वानुभव पाहता या गावांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. रात्री-अपरात्री भूस्खलनासारखी गंभीर घटना घडली तर इर्शाळवाडी किंवा माळीणसारखी घटना घडायला वेळ लागणार नाही. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
Kolhapur: पन्हाळ्याच्या पायथ्याला असणाऱ्या नावलीपैकी धारवाडीचा डोंगर खचला, नागरिकांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 3:59 PM