कोल्हापूर : शोषणमुक्त समाजाचे स्वप्न घेऊन गेली ४० वर्षे कष्टकऱ्यांचा संघर्षाचा अवााज बनलेल्या, अराजकीय जनचळवळ असलेल्या श्रमिक मुक्ती दलाचे वार्षिक अधिवेशन २९ ते ३१ तारखेदरम्यान गोठणे (दानोळी, ता. शिरोळ) येथे होत असल्याची माहिती ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या अधिवेशनात समन्यायी पाणी वाटप, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, देवालयांवर शासनाचे व्यवस्थापन, जातीमुक्ती, स्त्रीमुक्ती, निकोप राजकारण आणि मराठा आरक्षण या सात विषयांवर चर्चा होणार आहे.ते म्हणाले, समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत पाणी पाेहोचावे, अभयारण्यग्रस्त, धरणग्रस्तांना पाणी, जमिनी अन्य लाभ मिळावे, पंढरपुरातून हटवलेले बडवे पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरासाठी पुजारी कायदा केला पण अजून त्याची अंमलबजावणी केली नाही, जातीनिर्मूलन, अन्याय, अत्याचारामुळे सर्वाधीक बळी हा महिलांचा जातो त्यामुळे स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्याचा लढा कुणबी नोंद असलेल्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळावा या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होणार आहे.दलित, आदिवासी, श्रमिक, कष्टकरी शेतकऱ्यांची अनेक आंदोलने श्रमिकने केली व सरकारला जनतेच्या बाजूने नवे धोरण आखायला भाग पाडले हे या जनचळवळीचे यश आहे. मागीलवर्षी दिलेल्या लढ्याचा आढावा घेऊन नव्या वर्षातील आंदोलनांचे नियोजन अधिवेशनात केले जाणार असून त्यासाठी दहा जिल्ह्यातील ३०० हून अधिक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ३१ डिसेंबरला खुल्या अधिवेशनाने याची सांगता होईल. यावेळी कार्याध्यक्ष संपत देसाई, संतोष गोटल, मारूती पाटील, डी. के. बोडके उपस्थित होते.
श्रमिकच्या अधिवेशनात ठरणार कष्टकऱ्यांच्या संघर्षाची दिशा, कोल्हापुरात २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान आयोजन
By इंदुमती सूर्यवंशी | Published: December 21, 2023 6:32 PM