जयसिंगपूर : येथील सि.स.नं. १२६६ ऐवजी १२५१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा, या मागणीवरून वाद विकोपाला गेला. सोमवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समन्वय समितीच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. पालिकेत मुख्याधिकारीच नसल्याने संतापलेल्या मोर्चेकऱ्यांनी पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर कोल्हापूर-सांगली महामार्गावरील क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन करत ठिय्या मारला. अखेर मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी आंदोलकांसमोर आल्यानंतर सि.स.नं. १२६६च्या प्रस्तावावरून त्यांचे समाधान न झाल्याने मुख्याधिकाऱ्यांवर शाईफेक झाली. गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला.गेल्या दोन महिन्यांपासून जुन्या न्यायालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. सोमवारी याच मागणीसाठी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी बौद्ध विहारापासून मोर्चाला सुरुवात केली. क्रांती चौक येथे मोर्चा आल्यानंतर बसस्थानकात प्रस्तावित असणाऱ्या पुतळ्याच्या समर्थनार्थ लावलेला डिजिटल फलक वादाचे कारण बनला. तो हटविला.त्यानंतर मोर्चा पालिकेसमोर आल्यानंतर मुख्याधिकारी मुल्लाणी पालिकेत नसल्यामुळे आंदोलक संतप्त झाले. मुख्याधिकारी न आल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात ठिय्या मारून रास्ता रोको केला. रस्त्याच्या चारही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागून राहिल्या. प्रवासीवर्गाचे मोठे हाल झाले.अखेर मुख्याधिकारी मुल्लाणी क्रांती चौक येथे आंदोलनस्थळी आल्यानंतर बसस्थानकातील पुतळ्याचा प्रस्ताव रद्द करण्याबरोबरच सि.स.नं. १२५१ मध्ये तो उभारण्याबाबत आग्रह धरण्यात आला. यावेळी आंदोलकांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांच्या अंगावर शाईफेक झाली. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने क्रांती चौकात पोलिस व कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली. यामुळे मार्गावरील प्रवासी देखील सैरभैर पळू लागले. पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. यानंतर आंदोलन निवळले.
तर आमदार यड्रावकरांना बोलवा...मुख्याधिकारी नसतील तर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांना मोर्चासमोर बोलवा, अशी मागणी झाली. सुमारे तीन तास पालिकेसमोर हा गोंधळ सुरू असतानाच पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
मुख्याधिकाऱ्यांना बसविले रस्त्यावरक्रांती चौक येथे मुख्याधिकारी मुल्लाणी आल्यानंतर आंदोलकांनी त्यांना रस्त्यावर बसूनच चर्चा करावी, असा आग्रह धरल्यानंतर ते चर्चेसाठी खाली बसले.
त्यांच्यावर का कारवाई नाही?पालिकेसमोर मोर्चावेळी पोलिस उपअधीक्षक वैंजणे यांच्यावर आंदोलकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. बसस्थानक आवारात पुतळ्याचे बेकायदेशीर भूमिपूजन करणाऱ्यांवर का कारवाई झाली नाही, असा प्रश्न विचारताच ते निरुत्तर झाले.