कोल्हापूर : शाहू विचारांची उलटी गंगा वाहणारे, शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यांतूनच राजकीय, प्रशासकीय पदे भोगणारी मंडळी शाहू विचारद्रोह करत असल्याचा आरोप तरुण इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी रविवारी केला. शेतकरी संघाची जागा काढून घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयावर त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.त्यात सावंत म्हणतात, वासुदेव तोफखाने यांना विद्यापीठ हायस्कूलच्या वापरासाठी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराशेजारील राजवाड्याचा काही भाग की ज्या भागामध्ये शाहू महाराजांच्या आईंच्या नावाने अन्नछत्र चालवले जात होते; तो भाग देणगी देण्याचे ठरले होते. शाहू महाराजांनी तसा आदेशही काढला होता; पण काही सनातनी विचारांच्या दरबारी अधिकाऱ्यांना हे अन्नछत्र (बक) बंद व्हावे असे वाटत नव्हते; म्हणून वासुदेव तोफखाने यांना हा भाग देण्यासाठी ते टाळाटाळ करू लागले. ही गोष्ट शाहू महाराजांना वासुदेव तोफखाने यांनी सोनतळी येथील बंगल्यावर जाऊन सांगितली. त्यानंतर महाराजांनी स्वता उभे राहून वास्तू मोकळी करुन दिली होती.शेतकरी संघाची इमारत ज्या वास्तूसाठी शेतकऱ्यांनी कष्टाने पैसे जमा केले जी वास्तू गेली ३० ते ४० वर्षे शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे. तिची मालकी शेतकऱ्यांची आहे आणि अशी वास्तू ही फक्त दहा ते पंधरा दिवसांसाठी जे भक्त लोक येतात, त्या लोकांची सोय करू. पण आपण काहीतरी काम करून दाखवतोय अशा आविर्भावात जिल्हाधिकारी या वास्तूवर दावा करत आहेत.करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला येणाऱ्या भक्तांची सोय करण्याची जबाबदारी ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची आहे. याचे अध्यक्षपदही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडेच आहे. चांगली सोय या समितीला करता येत नाही. म्हणून काही दिवसांपूर्वी जिथे मेन राजाराम हे ऐतिहासिक हायस्कूल ताब्यात घेण्याचा घाट घातला गेला होता; पण जागरूक कोल्हापूरकरांमुळे हा डाव हाणून पाडला गेला.‘मी काहीतरी काम करतोय,’ असे आपल्या वरिष्ठ ‘पालकां’ना दाखवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोगलाईसारखा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय म्हणजे शाहू विचारद्रोह, कोल्हापुरातील शेतकरी संघाची जागा काढून घेण्याला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:16 PM