कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना उद्या, मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालयांत आणि ऑनलाइन ही प्रभागरचना पाहता येणार आहे. यासंबंधी सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांत आणि इच्छुकांत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रभागरचना जाहीर होताच इच्छुकांच्या हालचालींना वेग येणार आहे.
पहिल्यादांच महापालिकेची निवडणूक त्रिसदस्य पद्धतीने होणार आहे. यामुळे पूर्वीच्या ८१ प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली आहे. महापालिका निवडणूक प्रशासनाने हे काम दोन महिने अथक परिश्रमांनी करून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविले. आयोगाने प्रारूप प्रभागरचना उद्या, मंगळवारी जाहीर करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. याची तयारी निवडणूक प्रशासनाने केली आहे.
प्रभागरचना जाहीर होताच पुनर्रचित ३१ प्रभागांत कोणता भाग येणार, प्रभागाच्या हद्दी कशा असतील हे कळणार आहे. ही प्रभागरचना अंतिम नाही. यावर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहेत; पण हरकती कितीही आल्या तरी प्रारूप प्रभागरचनेत फारसा बदल होत नाही, असे निवडणूक प्रशासनाचे म्हणणे आहे. किरकोळ बदल होतो. यामुळे प्रारूप प्रभागरचनेच्या प्रसिद्धीलाच महत्त्व आहे.
अंतिम प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर प्रभागनिहाय आरक्षणाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अजूनही ओबीसी आरक्षणासंबंधीचा अंतिम निर्णय झालेला नाही. तो काय होणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, ३० प्रभागांत तीन आणि एका प्रभागांत दोन असे एकूण ९१ नगरसेवक असणार आहेत. एका प्रभागातील मतदारांची संख्या १७ हजारांवर असणार आहे. यामुळे प्रमुख पक्षांकडून उमेदवारी मिळविण्याकडेच बहुतांश इच्छुकांचा कल राहणार आहे.