कोल्हापूर : जिल्ह्यात २०१४ च्या आधी युतीचे १० आमदार होते, नंतर परिस्थिती बदलली. दोन्ही काँग्रेसला शिवसेनेची साथ मिळाली, मात्र जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे हात आभाळाला टेकले आहेत. ‘हम करेसो कायदा’ असे वागणे सुरू आहे. यापुढच्या काळात अहंकाराने वागणे खपवून घेणार नाही. जे बरोबर येतील त्यांना सोबत घेऊन निवडणुका लढवून जिंकणार असल्याचा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारल्यानंतर आमदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नूतन खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते. पाटील म्हणाले, महाडिक यांच्या निवडीने महाविकास आघाडीच्या हुकूमशाहीला छेद बसला म्हणून ही निवड राज्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. ‘कोल्हापूर उत्तर’च्या निवडणुकीआधी एक दिवस भाजप कार्यकर्त्यांना पैसे आहेत म्हणून पकडले. आता कुठे आहेत पैसे, कुठे आहेत त्या केसीस.
पश्चिम महाराष्ट्रात महाडिकांची ताकद आहे. आता भाजपही त्यांच्या पाठीशी आहे. आमदार आवाडे, आमदार विनय कोरे, रिपब्लिकन पक्ष, रासप यांच्यासह जे सोबत येतील त्यांना घेऊन निवडणुका लढवू. अपवादात्मक ठिकाणी चिन्हाचाही आग्रह नसेल. विमानतळ अर्धवट, थेट पाईपलाईन अर्धवट, पूर येऊ नये म्हणून भिंती घालणार होते. त्यातील काहीही झाले नाही. या सर्व प्रश्नांवर आता महाडिक आवाज उठवतील आणि कामे करून घेतील, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
लोकसभेची दोन्ही नावे तयार..
कोल्हापूर लोकसभेची दोन्ही नावे तयार आहेत पण ती वेळ आल्यावर जाहीर करू, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
दर महिन्याला केंद्रीय मंत्री आणा
पाटील म्हणाले, महाडिक यांना माझे सांगणे आहे. तुम्ही कोल्हापूरपुरते मर्यादित नाही. पण प्रत्येक महिन्याला जिल्ह्यात एक केंद्रीय मंत्री आणा. बैठका लावा, दिवसभर ते येथे थांबू देत. कार्यकर्त्यांना भेटू देत. प्रशासनाच्या आढावा बैठका लावा. आंदोलने, निवेदने, घेराव, उपोषण सर्व बाजूंनी कामकाज करावे लागेल.