कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजनांचे रयतेचे स्वराज्य निर्माण केले. औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानी मुसलमानांचा शत्रूच. त्यामुळे औरंगजेबाचे उदातीकरण होऊच शकत नाही, असे स्पष्ट आणि परखड प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. औरंगजेब हा आपला शत्रूच आहे, असेही ते म्हणाले. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी भवनामध्ये ते बोलत होते. नुकत्याच कोल्हापुरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना मुस्लिम समाजाविषयी कधीच आकस नव्हता. मुस्लिम समाजाचीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर तितकीच गाढ श्रद्धा होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदरी अनेक मुसलमान सरदार, वतनदार आणि इतर चाकरही होते. महाराजांच्या सैन्यदलाचा प्रमुख दौलतखान, महाराजांना जीवाला जीव देणारा आणि त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावणारा त्यांचा अत्यंत विश्वासू व खास अंगरक्षक मदारी मेहत्तर हे मुस्लिमच होते. तसेच, वकील काजी हैदर, सिद्धी हिलाल, शामाखान, नूरजहा बेगम असे २२ सरदार महाराजांच्याकडे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एवढे प्रमुख मुस्लिम असतील तर त्या सैन्यात मुस्लिम मावळे किती असतील, याचीही प्रचिती येते. ७५ वर्षांपूर्वी हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी फाळणी झाल्यानंतर भारतमाता हीच आमची आई आहे. या मातृत्वाच्या भावनेतूनच हिंदुस्तानी मुस्लिम समाज या मातीत राहीला. सामाजिक विद्वेषातून दंगे-धोपे आणि दंगली घडविणे हा काही लोकांचा अजेंडाच आहे. कोणत्याही बहकाव्यामध्ये येऊन या अजेंड्याला बळी पडू नका. मुस्लिम समाजाने आपल्या लहान, अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्या हातून अशा गोष्टी घडणार नाहीत, याचीही दक्षता घेतली पाहिजे. सावध राहा -बळी पडू नकाधर्मा -धर्मात तेढ वाढवून सामाजिक विद्वेष तयार करण्याच्या दृष्टिकोनातून कोणी कितीही चिथावणी देऊ देत. अशा चिथावणीखोरांना बळी पडू नका. सावध राहा - दक्ष रहा असे आवाहनही मुश्रीफ यांनी यावेळी केले. औरंगजेब आपला शत्रूचऔरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा शत्रू होता. त्यामुळे; औरंगजेब हा आपला होऊच शकत नाही, तो शत्रूच आहे. त्याचे उदातीकरण होऊच शकत नाही, करणे योग्यही नसल्याचे स्पष्ट मत मुश्रीफांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि मुस्लिमछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, सैनिक आणि नोकर-चाकरही होते. महाराजांच्या सैन्यदलात २२ प्रमुख मुस्लिम होते. मग सैन्यदलात मुस्लिम मावळे किती असतील, याचीही प्रचिती यावरून येते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार राजीव आवळे, युवराज पाटील, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर व प्रमुख मान्यवर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानी मुसलमानांचा शत्रूच, आमदार हसन मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं
By विश्वास पाटील | Published: June 10, 2023 3:52 PM