कोल्हापूर : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईडचे इंजेक्शन किंवा गोळ्यांची विक्री करणे बेकायदेशीर आहे. असे असतानाही प्रत्यक्षात मात्र अवैधपणे स्टेरॉईडच्या खरेदी-विक्रीतून दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. ऑनलाइन स्टेरॉईड विक्रीचीही यात भर पडली आहे. स्टेरॉईडची अवैध विक्री आणि गैरवापरावर कोणाचेच नियंत्रण नसल्यानेच ही समस्या चिंताजनक बनत आहे.अनेक आजारांमध्ये उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्टेरॉईडचा वापर केला जातो. हा वापर रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी असतो. मात्र, स्टेरॉईडच्या वापराबद्दल अज्ञान असणाऱ्या अनेकांकडून त्याचा गैरवापर केला जातो. याच अज्ञानाचा गैरफायदा घेऊन स्टेरॉईड विक्रीचे रॅकेट सक्रिय झाले आहेत. स्टेरॉईडची ऑनलाइन विक्री करून अनेक कंपन्या कोट्यवधी रुपयांची कमाई करीत आहेत.
शरीरसौष्ठव, भारोत्तोलन, कुस्ती यासह अनेक खेळांमधील खेळाडू स्टेरॉईडचा वापर करीत असल्याची धक्कादायक माहिती यापूर्वीही उघडकीस आली आहे. आता तर पोलिस भरती, सैन्य भरती प्रक्रियेत धावण्याच्या चाचणीवेळी स्टेरॉईड वापराचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.हे आहेत धोकेस्टेरॉईडमुळे शरीरात तात्पुरती ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण वाढतो. ओव्हरडोसमुळे व्यक्ती बेशुद्धावस्थेत जाते. स्टेरॉईडच्या अतिवापरामुळे हाडे ठिसूळ होतात. यकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. स्नायू ताठर बनतात. अचानक वजन कमी होणे, अशक्तपणा वाढणे, भूक मंदावणे, असे अनेक धोके निर्माण होतात.
तपास गतिमानअग्निवीर सैन्य भरतीदरम्यान कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर आढळलेल्या स्टेरॉईडच्या इंजेक्शन्सप्रकरणी तपास गतिमान झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त आश्विन ठाकरे यांनी दिली. पोलिस आणि अन्न औषध प्रशासनाकडून संयुक्त तपास सुरू असून, काही तरुणांकडे चौकशी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.