कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील गूळ मार्केटमध्ये गेले चार दिवस हमाली वाढीवरून निर्माण झालेला पेच शुक्रवारी मिटला. महागाई निर्देशांकानुसार हमाली वाढ किती द्यायची, याबाबत जिल्हाधिकारी जो निर्णय घेतील, तो मान्य करण्यावर हमाल, व्यापारी व शेतकऱ्यांचे एकमत झाले. गेले चार दिवस हमाली वाढीच्या आकड्यावरून खेचाखेची सुरू होती. मात्र, शेवटी विना आकड्याचाच मिटला.हमालीमध्ये ५० टक्के वाढीची मागणी करत मंगळवारपासून व्यापाऱ्यांकडील हमालांनी कामबंद आंदोलन सुरू केले. समिती प्रशासन, जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर अनेक बैठका झाल्या. मात्र, शेतकरी व्यापारी व हमाल आपआपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने, गुंता सुटला नाही. गुरुवारी बाजार समितीने हमालांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर यंत्रणा हलली होती.
शुक्रवारी दुपारी समितीमध्ये व्यापारी, अडते, शेतकरी व हमालांची बैठक झाली. यामध्ये महागाई निर्देशांकानुसार हमाली वाढ किती द्यावी, याबाबत नियमावली आहे. त्यानुसार हमाली वाढ देण्यास हमाल, व्यापारी व शेतकऱ्यांनी मान्यता दिली. आज, शनिवारपासून गुळाचे सौदे नियमित सुरू राहणार आहेत.
शुक्रवारी बॉक्सचा झाला सौदाहमाल कामबंदवर ठाम राहिले, तरी शुक्रवारी सौदे काढणारच, अशी भूमिका व्यापारी व शेतकऱ्यांनी घेतली हेती. त्यानुसार, सकाळी एक किलो बॉक्सचा सौदा काढला. मात्र, पाच व दहा किलोचा सौदा काढता आला नाही.
गुळाच्या हमाली वाढीबाबत बैठकीत निर्णय झाला आहे. महागाई निर्देशांकानुसार वाढ देण्यात सगळ्यांनीच संमती दर्शविल्याने पेच सुटला आहे. त्यामुळे आजपासून सौदे पूर्ववत होणार आहेत. - जयवंत पाटील (सचिव, बाजार समिती)
कायद्यानुसार हमाली वाढ किती द्यायची, याबाबत जिल्हाधिकारी जे निर्णय घेतील, तो सगळ्यांनीच मान्य केल्याने मार्ग निघाला. - अतुल शहा (संचालक, व्यापारी असोसिएशन)