शितल सदाशिव मोरे आजरा : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने राज्यातील मराठा व मागास कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण करणारे प्रगणक व पर्यवेक्षक यांना गेले सहा महिने मानधन मिळाले नव्हते. जिल्ह्यातील प्रगणक व पर्यवेक्षक यांचे मानधन देण्यासाठी ४ कोटी ३ लाखांचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे. जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसील कार्यालयांकडे मानधनाचा धनादेश पाठविला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात सर्वेक्षण केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार आहे.मराठा व मागास कुटुंबांच्या सर्वेक्षणानंतर राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, सध्या त्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. कुटुंबांचे सर्वेक्षण केलेले प्रगणक व पर्यवेक्षक गेल्या सहा महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत होते. अखेर मानधन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला निधी प्राप्त झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून हा निधी तालुका स्तरावरही पाठविण्यात आला आहे.मराठा व खुल्या प्रवर्गातील शंभर कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी प्रगणकास १० हजार रुपये, तर मागासवर्ग कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाप्रमाणे प्रगणकास रु. १०, तर प्रगणक प्रशिक्षणाकरिता प्रवास भत्ता रुपये ५०० प्रमाणे दिला आहे. पर्यवेक्षकांना १० हजार ५०० प्रमाणे मानधन दिले जाणार आहे. मानधनाची रक्कम प्रगणक व पर्यवेक्षकांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय मराठा कुटुंबांची संख्या
- करवीर - ५२,४८३
- गगनबावडा - ५,१७२
- हातकणंगले - ४८,३६९
- शिरोळ - ३८,५९३
- आजरा - १९,४४९
- भुदरगड - २२,६५३
- राधानगरी - २५,५१९
- कागल - ३७,६०९
- गडहिंग्लज - २९,३७४
- चंदगड - २८६५३
- पन्हाळा - ३०,१२९
- शाहूवाडी - १९,१६९
- एकूण - ३,५७,१६२
प्रगणकांना प्रवास भत्त्यासह मिळणारी रक्कम
- करवीर - ५९ लाख ५८ हजार
- गगनबावडा - ५ लाख ९१ हजार
- हातकणंगले - ५५ लाख ९६ हजार
- शिरोळ - ४४ लाख ९८ हजार
- आजरा - २१ लाख ६७ हजार
- भुदरगड - २५ लाख ६३ हजार
- राधानगरी - २८ लाख ३४ हजार
- कागल - ४२ लाख ३२ हजार
- गडहिंग्लज - ३२ लाख ३६ हजार
- चंदगड - ३१ लाख ५३ हजार
- पन्हाळा - ३३ लाख १८ हजार.
- शाहूवाडी - २१ लाख ४९ हजार
जिल्ह्यातील एकूण प्रगणक - ५,६७७.जिल्ह्यातील मागासवर्गीय कुटुंबांची संख्या - १,७४,६३७.जिल्ह्यातील मराठा कुटुंबाची संख्या - ३,५७,१६२.जिल्ह्यातील एकूण कुटुंबांची संख्या - ५,३१,७९९.