इचलकरंजी : वीजबिलाच्या थकबाकीपोटी वीजजोडणी तोडण्यासाठी आलेल्या महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास धक्काबुक्की करणाऱ्या पाच जणांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.नंदकुमार भीमराव लोखंडे, आत्माराम लोखंडे, अर्जुन पाटील, प्रसाद मेटे व योगेश वाघमारे अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता स्वप्निल यशवंत कोळी यांनी तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शाहूनगर गल्ली नं. एक मध्ये शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र यंत्रमागधारक सेना राज्याध्यक्ष नंदकुमार लोखंडे यांच्या कारखान्याचे वीजबिल थकीत असल्याने वीजजोडणी तोडण्यासाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुनील अकिवाटे व वरिष्ठ तंत्रज्ञ सागर म्हाकवे गेले होते. त्यावेळी उपरोक्त पाच जणांनी त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच खांबावरून खाली उतरण्यास मज्जाव केला. त्याचबरोबर कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनाही धक्काबुक्की करण्यासह त्यांची वाहने अडवत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच लोखंडे याने शिवसेना शाहूनगर नामक व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘लाइट कनेक्शन कट करणारे आलेल्या वायरमनना विरोध करा, आपल्या गावात आपली दादागिरी चालते, एक कानफाडीत मारली तरी चालेल’ असा चिथावणीखोर मजकूर व्हायरल केला. या कारणावस्तव लोखंडे याच्यासह पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वीजजोडणी तोडण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यास धक्काबुक्की, कोल्हापुरातील इचलकरंजीत घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 1:42 PM