राजाराम लोंढे कोल्हापूर : विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर ज्या गतीने पक्ष प्रवेश, उमेदवारांची घोषणा हाेणे अपेक्षित हाेते, ते होताना दिसत नाही. सगळ्या राजकीय पक्षांनी पितृपंधरवड्याची धास्ती घेतल्याने राजकीय घडामाेडी थंडावल्या आहेत.
गुरुवार (दि. ३) नंतर राज्यात उमेदवारांच्या घोषणा सुरू होतील आणि पक्षप्रवेशांचे पेवही फुटणार आहे. हिंदू संस्कृतीमध्ये राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात शुभमुहूर्तावरच केली जाते. काहीजण मानतात तर काहीजण मानतही नाहीत; पण राजकारणात या गोष्टीला फार महत्त्व दिले जाते. विधानसभा निवडणुकीचा बिगुल आठ-दहा दिवसांत वाजणारच आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र बऱ्यापैकी पूर्णही झालेले आहे. पण, ते जाहीर करण्याबराेबरच ज्यांची उमेदवारी निश्चित आहे, त्यांची घोषणा करण्यास पितृपंधरवड्याचा अडथळा निर्माण झाला आहे.महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागांचे बऱ्यापैकी वाटप झाल्याने कोणाला उमेदवार मिळणार आणि कोणाला थांबावे लागणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे अनेकांचे पक्षप्रवेश निश्चितही झालेले आहेत.
पितृ पंधरवडा म्हणजे काय?भाद्रपद पौर्णिमेच्या नंतर अमावास्येपर्यंत जो पंधरवडा असतो, त्याला पितृ पंधरवडा म्हटले जाते. पित्र म्हणजे या कालावधीत आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळवण्यासाठी प्रार्थना केली जाते. असे केल्याने त्यांच्या वंशजाच्या अडचणी कमी होतात, असे म्हटले जाते.