कोल्हापूर : सांगरुळ विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतरच्या दुसऱ्या म्हणजेच १९८० च्या निवडणुकीत विद्यमान आमदार श्रीपतराव बोंद्रे (दादा) व मारुतीराव खाडे (बाबा) यांच्यात काटा लढत झाली होती. या लढतीत गोविंदराव कलिकते (साहेब) यांनी रंगत आणली होती. तिरंगी लढतीचा फटका खाडे यांना बसला आणि त्यांचा अवघ्या ३६६३ मतांनी पराभव झाला. बोंद्रे यांच्याविरोधात आव्हान निर्माण करून दिलेल्या निकराच्या झुंजीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती.महाराष्ट्रात १९७८ ला विधानसभा मतदारसंघांची पुर्नरचना झाली आणि ‘करवीर’ व ‘राधानगरी’तील गावांचा समावेश करून ‘सांगरुळ’ मतदारसंघ अस्तित्वात आला. येथून पहिल्या निवडणुकीत श्रीपतराव बोंद्रे व गोविंदराव कलिकते यांच्यात सामना झाला. बोंद्रे यांनी ९८३९ मतांनी कलिकते यांचा पराभव केला. त्यानंतर दोनच वर्षांत १९८० ला मध्यावधी निवडणुका लागल्या. यावेळी काँग्रेस (अर्स)कडून श्रीपतराव बोंद्रे, काँग्रेस (इंदिरा)कडून मारुतीराव खाडे तर ‘शेकाप’कडून गोविंदराव कलिकते अशी तिरंगी लढत झाली होती. श्रीपतराव बोंद्रे यांचे राजकीय वजन अधिक होते. त्या तुलनेत मारुतीराव खाडे साधा व रांगडा माणूस, त्यामुळे ही लढत एकतर्फी होईल, असा अंदाज होता. पण खाडे यांच्या उमेदवारीनंतर करवीर तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी राबवलेली प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांची एकजूट आणि सामान्य माणसांमधील सहानुभूतीच्या बळावर त्यांनी निकराची झुंज दिली. या लढतीत त्यांचा अवघ्या ३६६३ मतांनी पराभव झाला. गोविंदराव कलिकते हे थांबून एकास एक लढत झाली असती तर चित्र वेगळे दिसले असते, असे त्यावेळी प्रचारात सक्रिय असणारे आजही सांगतात.वर्गणी काढून खाडेंना केले उभेमारुतीराव खाडे यांचे सांगरुळ परिसरासाठी खूप मोठे योगदान होते. त्यांनी निवडणुकीला उभे राहावे, यासाठी लोकांनी ५० रुपयांपासून १ हजारांपर्यंत वर्गणी काढून त्यांना दिली होती. गोरगरीब कार्यकर्ता स्वत:ची भाकरी बांधून महिना महिनाभर प्रचारासाठी घरापासून लांब असायचा.
अखंड निवडणुकीत एक-दोनच सभात्यावेळी प्रचाराची हायटेक साधने नसायची. उमेदवारांची आर्थिक स्थितीही जेमतेमच असायची. त्यामुळे ना मोठ्या सभा, ना शक्तिप्रदर्शन, ट्रक, ट्रॅक्टर, सायकलवरून प्रचार यंत्रणा राबवली जात होती. खासदार, मंत्र्यांच्याच सभा अन्यथा थेट गाठीभेटींवरच प्रचाराचा भर असायचा.दृष्टीक्षेपात १९८० ची लढत..
- एकूण मतदान : १ लाख ४ हजार ३५९
- झालेले मतदान : ८१ हजार ७९६
- टक्केवारी : ७८.७४ टक्के
- श्रीपतराव बोंद्रे : २९ हजार ८७९ (३६.५३ टक्के)
- मारुतीराव खाडे : २६ हजार २१६ ( ३२.०५ टक्के)
- गोविंदराव कलिकते : २५ हजार ७०१ ( ३१.४२ टक्के)