इंदुमती सूर्यवंशी, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बनवण्यात येत असलेली मतदार यादी अधिक बिनचूक व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने १२ राज्यातील अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी मुदतवाढ दिली आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी आता ५ जानेवारीऐवजी नव्या निर्देशानुसार २२ जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाकडे काही राज्यांकडून मतदार यादीचे विशेष सारांश पुनरिक्षण तसेच मतदार यादीच्या अंतिम प्रकाशनापूर्वी हरकती व अर्जांची सर्व प्रकरणे निकाली काढण्याची खात्री करण्यासाठी, मुदतवाढीची विनंती करण्यात आली होती. ही विनंती विचारात घेऊन आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी २२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडू, उत्तराखंड, उत्तरप्रदेश व दिल्ली या राज्यांसाठी ही मुदतवाढ लागू आहे. त्यानुसार १२ जानेवारीपर्यंत मतदार यादीतील दावे व हरकती निकाली काढली जातील. १७ जानेवारीपर्यंत मापदंड तपासणे आणि मतदार यादी अंतिम करण्यासाठी आयोगाची परवानगी, यादी अपडेट करण्यात येणार आहे. व अंतिम मतदार यादी २२ जानेवारीला प्रसिद्ध होईल.या मुदतवाढीमुळे ९ डिसेंबर नंतरदेखील ज्या हरकती, दावे व अर्ज आले आहेत ते निकाली काढता येणार आहे. दुबार मतदारांची नावे वगळले जातील व अधिक बिनचूक मतदार यादी तयार होणार आहे.