- प्रशांत कोडणीकर
नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा दुपारी एक वाजता संपन्न झाला अधिक महिना व रविवार यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्याने मंदिरात आलेले कृष्णा नदीचे ओसरलेल्या नदीच्या पाण्यात पुन्हा वाढ झाली आणि आज दुपारी एक वाजता चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.
भाविकांनी दिगंबरा दिगंबराच्या व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला. दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे प्रसारित झाल्याने सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज इत्यादी ठिकाणाहून भाविकांनी स्नान व दर्शनासाठी हजेरी लावली. भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मार्फत अधिक सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान, श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी प प श्री नारायण स्वामी यांचे मंदिरात ठेवण्यात आली आहे. नृसिंहवाडी व औरवाड यांना जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.दक्षिणदवार सोहळा या योगायोगच- श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर बाजूने येणारा कृषणा नदीचा प्रवाह येथील दत्त चरणांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडतो. या सोहळ्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात.
श्री. चरणावरून येण्याऱ्या कृष्णा प्रवाहात स्नान केल्याने पापांचा ऱ्हास होऊन पुण्याची प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक स्नान व दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र नदीची पाणी पातळी वाढणे, कमी होणे हे निसर्गावर अवलंबून असल्याने व मंदिराच्या गर्भद्वाराची चौकट एक फूट उंचीची असल्याने हा सोहळा कधी सुरू होईल व संपेल हे नक्की सांगता येत नाही. यात स्नान करायला मिळणे हा योगायोगच असतो. हा सोहळा पाणी वाढताना व उतरताना असा दोन्ही वेळा होतो.