कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींसाठी उद्या, मंगळवारी सकाळी आठपासून तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणुकीतील ईर्षा पाहता, निकालाबाबत कमालीची उत्सुकता असून, सकाळी उठायच्या अगोदरच गावगाड्यात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण सुरू होणार आहे.गेली महिनाभर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे गावगाड्यातील राजकारण पुरते ढवळून निघाले होते. रविवारी ४३० ग्रामपंचायतींसाठी चुरशीने व ईर्षेने मतदान झाले. एका एका मतासाठी ताकद लावल्याने, अनेक गावांत ९० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. साम, दाम, दंड सर्व नीतींचा वापर जोरात झाल्याने निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे.मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मोजणी सुरू होणार आहे. त्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासूनच गावगाड्यात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू होणार आहे.संवेदनशील गावांची शेवटी मोजणीतालुक्यातील संवेदनशील गावांची मतमोजणी अंतिम टप्प्यात करण्याचे नियोजन निवडणूक यंत्रणेची आहे. त्यामुळे या गावातील उमेदवारांना दुपारी बारापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.विजयी मिरवणुकांना परवानगी नाहीचमतमोजणीसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. तसेच वाहतूक नियोजनातही बदल केले जाणार आहेत. दरम्यान, मतमोजनीनंतर गावात विजयी मिरवणुका काढण्यावर यंदाही पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. त्यामुळे विजयाचा आनंद साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे.या गावांवर पोलिसांची नजरशहरालगत असलेले पाचगाव, उचगाव, शिरोली, उजळाईवाडी, प्रयाग चिखली, वडणगे या गावांसह सांगरूळ, वाकरे, शिंगणापूर, पाडळी बुद्रुक, परिते (ता. करवीर), घोटवडे, कौलव (ता. राधानगरी) या गावांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.
Gram Panchayat Election: कोल्हापुरात उद्या सकाळी ८.३०ला गुलालाची उधळण, विजयी मिरवणुकांना परवानगी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 6:51 PM