कोल्हापूर : रोटरी सनराईज, चंद्रकांत हंजारीमलजी राठोड परिवार व सिद्धगिरी मठ यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येत असलेल्या राज्यातील पहिल्या भटक्या श्वान शाळेचे उद्घाटन गुरुवारी (दि.१९) होत असल्याची माहिती सचिन मालू यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन १८ व १९ जानेवारीला होत आहे.शहर आणि परिसरातील अनाथ, नवजात पिल्लू व जखमी श्वानासाठी या श्वान शाळेमधून खाद्य, औषधोपचार व वेळोवेळी लसीकरणाची सोय मोफत करण्यात येणार असून या शाळेत पहिल्या टप्प्यात ४०० श्वानांची सोय होणार आहे. कणेरीमठ येथे ९० लाख खर्चून उभारण्यात आलेला राज्यातील ही भटक्या श्वानांची पहिलीच शाळा आहे. गतवर्षी चालू केलेल्या प्रकल्पाची पूर्तता झाली असून त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते होणार आहे. रोटरी सनराईजचे अध्यक्ष ऋषिकेश खोत, राहुल कुलकर्णी, सचिन मालू, व्यंकटेश देशपांडे, नासिर बोरसदवाला, शरद पै, अरुण भंडारी, करुणाकर नायक, सुभाष कुत्ते, अजय मेनन हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.असे प्रकल्प : बुधवारी (दि. १८) सकाळी १० वाजता स्वयं शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १५ लाख खर्चून उभारण्यात आलेल्या ई-लर्निंग सुविधा व सेन्सॉर गार्डनचे उद्घाटन. दुपारी ३ वा. कदमवाडी येथील डाॅ. डी. वाय. पाटील हाॅस्पिटल येथे उभारण्यात आलेल्या शिशुरक्षा या विभागाचे तर मणक्यावरील शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ४० लाखांच्या उपकरणाचे उद्घाटन डाॅ. जी. व्ही. बसवराजा यांच्या हस्ते. गुरुवारी (दि. १९) सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये देण्यात आलेल्या न्यूरो माॅनिटरिंग मशीन व मॅमोग्राफी युनिटचे उद्घाटन.
राज्यात पहिली भटक्या कुत्र्यांची शाळा कोल्हापुरात; ४०० श्वानांची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 7:21 PM