संदीप आडनाईककोल्हापूर : काजवा महोत्सवाबरोबरच वनविभागाने राधानगरी आणि दाजीपूर परिसरात जंगल सफारी सुरू केली आहे. यातूनही वन विभाग महसूल जमा करीत आहे. अभयारण्य आणि राखीव क्षेत्रात तसेच व्याघ्र कॉरिडॉरमध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी मुभा दिल्यामुळे वन्यप्राण्यांच्या संवर्धनाऐवजी वनपर्यटनालावनविभाग चालना देत आहे.
वनविभागाने सातारा जिल्ह्यातील कास पठारावर, सागरेश्वर आणि राधानगरी, दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात जंगल सफारी, मेळघाट, ताडोबा या ठिकाणीही वनविभागाने रात्रसफारी सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक, वन्यजीवांचे संवर्धन करणे ही वनविभागाची मुख्य जबाबदारी आहे. निसर्ग आणि वनपर्यटनाच्या माध्यमातून जनतेचे, पर्यटकांचे मनोरंजन करणे, त्यांची करमणूक करणे हे काम वन्यजीव संरक्षण संवर्धनाचे सर्व कायदे धाब्यावर बसवून वनविभाग करू लागले आहे. इतकेच नव्हेतर, गाड्या खरेदी करून पर्यटकांकडून प्रतिव्यक्ती ठरावीक रक्कम घेतली जात आहे. वनखात्याचे विश्रामगृह उपलब्ध करून दिले जात आहे.
इतर राज्यांत रात्री प्रवेशाला बंदी
- वनक्षेत्र परिसरात रात्री निशाचर व वन्यप्राण्यांचा वावर असतो. हे वन्यप्राणी रात्री पाण्यासाठी, शिकारीसाठी आणि अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. रात्री वन्य प्राण्यांच्या अधिवासात माणसांनी प्रवेश केल्यास त्यांच्या नैसर्गिक दिनक्रमात व्यत्यय निर्माण होतो. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासात रात्रसफारी व जंगल सफारी केवळ पर्यटनासाठी सुरू करणे धोकादायक आहे. हे वन्यप्राणी माणसांवर हल्लाही करू शकतात.
- कर्नाटक, तामिळनाडू, केरळ राज्यातील वनक्षेत्रात रात्री माणसांच्या प्रवेशाला पूर्ण बंदी आहे. महाराष्ट्रात मात्र अशी बंदी नसल्याने रात्रीही वनक्षेत्रात माणसांचा हस्तक्षेप सुरू असतो. यावर वनविभागाचे प्रभावी नियंत्रण नाही.
व्यापारी पद्धतीने, कर्तव्ये बाजूला ठेवून, जबाबदारी टाळून वनविभाग वनपर्यटनाला चालना देत आहे. वास्तविक, निसर्गपूरक पद्धतीने वनपर्यटनाला चालना दिली पाहिजे. इतर राज्यांतील वनपर्यटनाची तुलना करता आपल्याकडे सुरू असलेले वनपर्यटन पूर्णत: निसर्गपूरक नाही. या पर्यटनात अनेक चुका व त्रुटी आहेत. यात सुधारणा करणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही सुधारणा व बदल न करता रात्र सफारी, जंगल सफारीसारखे निसर्गविरोधी व वन्यजीव संरक्षण व संवर्धनविरोधी उपक्रम सुरू केले आहेत. - डॉ. मधुकर बाचुळकर, वनस्पती शास्त्रज्ञ.