गडहिंग्लज : मुख्यमंत्री लाडकी बहीणसह विविध योजना सुरू केल्यानंतरही राज्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. त्यांना विरोध करून राज्याची बदनामी करणाऱ्यांना जनता विधानसभा निवडणुकीत धडा शिकवेल. त्यामुळे राज्यात पुन्हा 'महायुती'चेच सरकार येईल. चंदगड, आजरा, गडहिंग्लजच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार राजेश पाटील यांच्यामागे आपली शक्ती उभी करू,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.नेसरी येथे आमदार राजेश पाटील यांच्या विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. गडहिंग्लजच्या पूर्वभागाला हक्काचे पाणी देण्यासाठी नियोजित किटवडे प्रकल्प, पर्यटन विकासातून रोजगारनिर्मितीसह चंदगड मतदारसंघातील विकासकामांसाठी दुप्पट निधी देण्याचा शब्दही त्यांनी दिला.राजेश पाटील म्हणाले, दुर्गम भागाच्या विकासासाठीच आपण अजितदादांसोबत गेलो, कुणाशीही दगाफटका केलेला नाही.'चंदगड'मधील शांततेचा भंग करू पाहणाऱ्यांची 'भाईगिरी', 'ताईगिरी'कदापिही चालू देणार नाही.यावेळी राजेंद्र गडयान्नावर, संग्रामसिंह कुपेकर, हेमंत कोलेकर, मुन्ना नाईकवाडी, दीपक पाटील, नामदेव निट्टूरकर, अल्बर्ट डिसोझा, युवराज पाटील, सुभाष देसाई यांचीही भाषणे झाली. मेळाव्याला रामापा करिगार, बाबासाहेब पाटील, भिकू गावडे,सुधीर देसाई, प्रकाश चव्हाण, सतीश पाटील, प्रकाश पताडे, संजय संकपाळ, सुनीता रेडेकर, कल्लापा नेवगिरे, दिलीप कांबळे, महाबळेश्वर चौगुले, जयसिंग चव्हाण, दीपक जाधव, उपस्थित होते.
'दौलत'खाली करा, आम्ही चालवू !साखरेच्या उताऱ्यात गडबड करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांनी कारखाना खाली करून निघून जावे,आम्ही तो सक्षमपणे चालवू, असा इशारा उपमुख्यमंत्री पवार यांनी नामोल्लेख टाळून विरोधी उमेदवार मानसिंग खोराटे यांना दिला.
राजेश पाटील 'दमदार आमदार'राजेश पाटील हे दमदार आमदार आहेत. स्व. बाबासाहेब कुपेकर, सदाशिवराव मंडलिक व नरसिंगराव पाटील यांचा वारसा सक्षमपणे पुढे नेत आहेत. त्यांनी चंदगड, गडहिंग्लज, आजऱ्याच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यांना पुन्हा संधी द्या, त्यांच्या विजयी मेळाव्याला पुन्हा येईन,असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी आवर्जून सांगितले.